---Advertisement---

भारत वि न्यूझीलंड, कानपूर कसोटी: दुसरा दिवस पाहुण्यांच्या नावे; सलामीवीरांची अभेद्य भागीदारी

On: शुक्रवार, नोव्हेंबर 26, 2021 4:38 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ ३४५ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर न्यूझीलंडने दुसरे आणि तिसरे सत्र यशस्वीरित्या खेळून काढत बिनबाद १२९ धावा करून दुसरा दिवस आपल्या नावे केले. भारताचा श्रेयस अय्यर याचे शतक, साऊदीचे पंचक व न्यूझीलंडच्या सलामीवीरांचा शानदार खेळ या दिवसाचे वैशिष्ट्य राहिले.

भारताची ३४५ पर्यंत मजल
पहिल्या दिवशीच्या ४ बाद २५८ वरून भारतीय संघाने खेळाला सुरुवात केली. मात्र, रवींद्र जडेजा पहिल्या दिवशीच्या धावसंख्येत (५०) एकाही धावेची भर न घालता माघारी परतला. यष्टीरक्षक वृद्धिमान साहा दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. मात्र, श्रेयस अय्यरने एक बाजू लावून धरत कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने १२ चौकार व २ षटकार ठोकत १०५ धावांची खेळी केली. त्यानंतर रविचंद्रन अश्विन वगळता (३८) आणखी कोणताही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. परिणामी, भारताचा डाव ३४५ धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंडसाठी टीम साऊदी याने सर्वाधिक पाच बळी आपल्या नावे केली.

न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी दाखवले धैर्य
फिरकीपटूंना मदतगार असणाऱ्या ग्रीन पार्क येथील खेळपट्टीवर न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम व विल यंग यांनी अभूतपूर्व धैर्य दाखवले. दोघांनी दुसऱ्या सत्रात आक्रमण आणि संयम यांचा सुरेख ताळमेळ साधत ७२ धावा काढल्या होत्या. तिसऱ्या सत्रात भारतीय फिरकीपटू नी काहीशी नियंत्रित गोलंदाजी केली. मात्र, बळी घेण्यात एकही भारतीय गोलंदाज यशस्वी ठरला नाही. अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा न्‍यूझीलंड संघाने बिनबाद १२९ धावा केल्या आहेत. यंग ७५ तर लॅथम ५० धावा काढून नाबाद आहे. न्यूझीलंड संघ अजूनही २१६ धावांनी पिछाडीवर आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---