भारत आणि न्यूझीलंड यांच्यात येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या मोठ्या सामन्याकरिता भारतीय संघ इंग्लंडला पोहोचला आहे. तर न्यूझीलंड संघ इंग्लंड संघाविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळत आहे. अशातच विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आहे.
इंग्लंड संघाविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघातील नामवंत फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. स्टार खेळाडूंनी सजलेला न्यूझीलंड संघाचा मध्यक्रम या सामन्यात साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. डेवोन कॉनवेची द्विशतकीय खेळी वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाहीये. हे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या दृष्टीने भारतीय संघासाठी चांगले संकेत आहेत.
निकोलसने दिले महत्वाचे योगदान
कॉनवेच्या द्विशतकीय खेळीसह निकोलसने ६१ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले होते. तर निल वॅगनरने २५ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले होते. पण कर्णधार केन विलियमसनला अवघ्या १३ धावा करण्यात यश आले होते. तर रॉस टेलर, बीजे वाटलिंग, कॉलिन डी ग्रँडहोम या मध्यक्रमातील फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यामुळे भारतीय संघाला या फलंदाजांविरूद्ध रणनीती बनवणे सोपे जाऊ शकते.
कॉनवेने दिली एकहाती झुंज
इंग्लंड संघाविरुद्ध लॉर्डस येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात कॉनवेने एकहाती झुंज दिल्याचे पाहायला मिळाले आहे. न्यूझीलंड संघाच्या धावा ८६ असताना, टॉम लेथम आणि केन विलियमसन हे माघारी परतले होते. त्यानंतर कॉनवे आणि निकोलस यांनी न्यूझीलंड संघाचा धावफलक हलता ठेवला होता. या दोघांनी मिळून संघाची धावसंख्या ११४ पासून ते २८८ पर्यंत घेऊन जाण्यात मोलाची भूमिका बजावली.
मध्यक्रम बनू शकते विलियमनच्या चिंतेचे कारण
निकोलस बाद झाल्यानंतर न्यूझीलंड संघाच्या धावफलकाला ब्रेक लागला होता. यष्टीरक्षक फलंदाज वॅटलिंग अवघ्या ११ धावा करू शकला. तर अष्टपैलू ग्रँडहोम १० चेंडू खेळून भोपळा देखील फोडू शकला नाही. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना तोंडावर असताना, न्यूझीलंड संघाच्या मध्यक्रमाची अशी अवस्था नक्कीच कर्णधाराची चिंता वाढवू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल नाहीतर ही लीग सर्वोत्तम, आंद्रे रसेलचे धक्कादायक विधान
परदेशी खेळाडूंना मोठा झटका! उर्वरित आयपीएलला नकार दिल्यास बीसीसीआय करणार ही कारवाई
धोनीचा वारसा पुढे चालवण्यासाठी सज्ज आहे झारखंडचा हा युवा यष्टीरक्षक