न्यूझीलंड आणि भारत यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना ख्राईस्टचर्च येथे खेळला गेला. यजमान न्यूझीलंड संघ सामन्यात आघाडीवर असताना पाऊस आल्याने, अखेर सामना रद्द करावा लागला. यासह न्यूझीलंड संघाने ही मालिका 1-0 अशा फरकाने आपल्या नावे केली. न्यूझीलंडचा टॉम लॅथम याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
The third & final #NZvIND ODI is called off due to rain 🌧️
New Zealand win the series 1-0.
Scorecard 👉 https://t.co/NGs0HnQVMX #TeamIndia
📸 Courtesy: Photosport NZ pic.twitter.com/73QtYS5SJm
— BCCI (@BCCI) November 30, 2022
मालिकेतील पहिला सामना गमावून पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. मात्र, न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या तिखट माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांचा निभाव लागला नाही. भारताचे दोन्ही सलामीवीर शिखर धवन व शुबमन गिल अनुक्रमे 28 व 13 धावा करून माघारी परतले. या सामन्यात चौथ्या क्रमांकावर बढती देण्यात आलेला रिषभ पंत याची जादू या सामन्यातही चालली नाही. तो 16 चेंडूवर 10 धावा करत बाद झाला. सूर्यकुमार यादवही केवळ 6 धावा बनवू शकला.
चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या श्रेयस अय्यरने आपल्या फॉर्मचा फायदा घेत 59 चेंडूवर आक्रमक 49 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर दीपक हुडा व दीपक चहर यांनी प्रत्येकी 12 धावांचे योगदान दिले. युझवेंद्र चहलने 8 व अर्शदीपने 9 धावा करून भारताला 200 पार नेण्यात खारीचा वाटा उचलला. वॉशिंग्टन सुंदर भारताचा अखेरचा गडी म्हणून बाद झाला. त्याने 64 चेंडूवर 51 धावांची खेळी केली. यासह भारताचा डाव 47.3 षटकात 219 धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलडसाठी डॅरिल मिचेल व ऍडम मिल्ने यांनी प्रत्येकी 3 बळी मिळवले.
विजयासाठी मिळालेल्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाचे सलामीवीर डेवॉन कॉनवे व फिन ऍलन यांनी तुफानी सुरुवात केली. दोघांनी 16.3 षटकातच 97 धावा जोडल्या. ऍलन 57 धावा करत बाद झाल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. 18 षटकांनंतर पावसामुळे पुन्हा खेळाला सुरुवात झाली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार वनडे क्रिकेटमध्ये दोन्ही संघ प्रत्येकी 20 षटके खेळले असतील तर सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार देण्यात येतो. मात्र, न्यूझीलंडने 18 षटकेच खेळ केल्याने हा सामना अखेर रद्द करण्यात आला. न्यूझीलंडचा यष्टीरक्षक टॉम लॅथम हा मालिकावीर ठरला.
(Newzealand V India 3rd Odi called of due to rain newzealand win series)