बांगलादेश विरुद्ध पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत ३-२ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेट संघ वनडे व टी२० मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये दाखल झाला आहे. तब्बल १८ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर न्यूझीलंड संघ पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने खेळेल. अखेरच्या वेळी न्यूझीलंडने २००३ साली पाकिस्तानमध्ये वनडे मालिका खेळली होती. केन विलियम्सनच्या अनुपस्थितीत सध्या न्यूझीलंड संघाची धुरा यष्टीरक्षक टॉम लॅथम वाहत आहे.
पाकिस्तानमध्ये क्रिकेटचे पुनरुज्जीवन
सन २००९ मध्ये श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला असताना लाहोर येथील कदापि स्टेडियमच्या बाहेर श्रीलंका संघाच्या बसवर आतंकवादी हल्ला झाला होता. यामध्ये श्रीलंकेचे काही खेळाडू जखमी झाले होते. त्यानंतर, सर्व आंतरराष्ट्रीय संघांनी पाकिस्तानमध्ये खेळण्यावर बहिष्कार टाकला होता. मात्र, मागील काही काळापासून अनेक संघ पाकिस्तानचा दौरा करत आहेत. टी२० विश्वचषकाआधी न्यूझीलंड संघाचा हा अखेरचा दौरा असेल. विशेष म्हणजे न्यूझीलंड संघाचा फलंदाजी प्रशिक्षक थिलन समरविरा २००९ मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या हल्ल्यावेळी जखमी झाला होता. त्याच्या मांडीमध्ये गोळी घुसलेली.
असा राहिला होता मागील मालिकेचा निकाल
न्यूझीलंडने २००३ मध्ये अखेरच्या वेळी ख्रिस केर्न्सच्या नेतृत्वात पाकिस्तानमध्ये पाच सामन्यांची वनडे मालिका खेळली होती. या मालिकेत न्यूझीलंडला अत्यंत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. पाकिस्तानने या मालिकेत ५-० असा एकतर्फी विजय मिळवलेला. यानंतर आता न्यूझीलंड संघ १८ वर्षानंतर पाकिस्तानमध्ये खेळताना दिसेल.
अशी असेल मालिका
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये या दौऱ्यावर तीन वनडे व पाच टी२० सामन्यांची मालिका खेळली जाईल. वनडे मालिकेतील सर्व सामने रावळपिंडी येथे तर, सर्व टी२० सामने लाहोर येथे खेळवले जाणार आहेत. वनडे सामने १७, १९ व २१ सप्टेंबर रोजी तर, टी२० सामने २५,२६, २९ सप्टेंबर व १, ३ ऑक्टोबर रोजी होणार आहेत. न्यूझीलंडने या दौऱ्यासाठी आपला दुय्यम संघ पाठवला असून, नियमित कर्णधार केन विलियम्सन व अन्य प्रमुख खेळाडू या काळात यूएई येथे होणाऱ्या आयपीएलच्या उर्वरित हंगामात सहभागी होतील.