ब्राझीलचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू नेमार याने नुकतीच पुढील वर्षी कतारमध्ये होणारी विश्वचषक स्पर्धा आपली अखेरची आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल अशी घोषणा केली होती. त्यानंतर, जगभरातील चाहते त्याला असे न करण्याबाबत विनवण्या करत आहेत. त्याच वेळी आता त्याचे संघसहकारी देखील त्याने आपला निर्णय बदलावा अशी अपेक्षा करत आहेत.
संघ सहकाऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
उरुग्वेविरुद्ध गुरुवारी ब्राझीलच्या विश्वचषक पात्रता सामन्यापूर्वी संघाचा अनुभवी डिफेंडर आणि नेमारचा मित्र थियागो सिल्वा म्हणाला, “त्याने मैदानावर काय केले ते आपण विसरतो आणि जे महत्त्वाचे नाही त्यावर लक्ष केंद्रित करतो. तो स्वतःवर खूप दबाव घेतो. आशा आहे की तो खेळाचा आनंद घेत राहील.”
दुखापतीमुळे खेळू न शकलेल्या स्ट्रायकर रिचर्लिसनने मनौसमधील चाहत्याने दाखवलेल्या बॅनरचे एक छायाचित्र ट्वीट केले होते. ज्यात लिहिले होते की, ‘नेमार, जर तू स्वर्गात खेळशील तर मी तुला पाहण्यासाठी मरेन.’
मिडफिल्डर फ्रेड म्हणाला,
“त्याने वर्षानुवर्षे आमच्यासोबत राहावे अशी आमची इच्छा आहे. पण दुसऱ्याच्या मनाच्या स्थितीबद्दल बोलणे कठीण आहे. कधीकधी खेळाडूंना प्रचंड दबावाला सामोरे जावे लागते. फक्त नेमारच नाही तर मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो हे दिग्गजही या स्थितीतून गेले आहेत. आम्हाला तो संघात हवाय. तो ब्राझीलच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे.”
रविवारी कोलंबियाविरुद्ध गोलशून्य बरोबरी खेळल्यानंतर नेमार शांतपणे मैदानाबाहेर गेला.
जुलैमध्ये ब्राझीलसाठी कोपा अमेरिका विजेतेपद पटकावण्यात नेमार अपयशी ठरला. अंतिम फेरीत अर्जेंटिनाकडून संघाचा पराभव झाला. यानंतर, नेमारला पॅरिस सेंट जर्मनसह क्लबच्या हंगामातही चांगली सुरुवात करता आली नाही. अलीकडेच, त्याने कोलंबियाविरुद्धच्या सामन्यात १७ पास चुकवले. तसेच, तो थकलेला दिसत होते. आतापर्यंत नेमारने दोन विश्वचषक खेळले आहेत आणि त्यात त्याचा खेळ लक्षात ठेवण्यासारखा नव्हता. २०१४ मध्ये कोलंबियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत तो जखमी झाला होता. त्यानंतर २०१८ मध्येही त्याच्या नेतृत्वाखाली संघ उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमकडून हरला.