कोलंबो। आज भारत विरुद्ध बांगलादेश संघात निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेतील अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा विजय मिळवून या वर्षीच्या आंतराष्ट्रीय मोसमाचा शेवट गोड करण्याचा प्रयन्त असेल, तर बांग्लादेशही यजमान श्रीलंकेवर मिळवलेल्या विजयामुळे आत्मविश्वासाने मैदानात उतरेल.
भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने मागील सामन्यात बांग्लादेश विरुद्धच दमदार अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे या सामन्यातही त्याच्याकडून आशाच खेळाची अपेक्षा चाहत्यांना असणार आहे. या स्पर्धेत भारताच्या तरुण गोलंदाजांनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी आत्तापर्यंत या स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे.
या मालिकेत भारताने पहिला सामना सोडला तर बाकी तीनही सामने सहज जिंकले आहेत. त्यातील दोन्ही सामने तर त्यांनी बांग्लादेश विरुद्धच जिंकले आहेत. तसेच बांग्लादेशनेही या मालिकेत चांगली कामगिरी करताना यजमान श्रीलंकेला दोन्ही साखळी सामन्यात नमवले आहे.
परवा श्रीलंका विरुद्ध पार पडलेल्या ‘करो या मरो’च्या सामन्यात बांग्लादेशने शेवटच्या क्षणाला सामन्यात विजय मिळवला होता. मेहमुद्दलाहने बांग्लादेशला २ चेंडूत विजयासाठी ६ धावांची गरज असताना षटकार खेचून बांग्लादेशचे अंतिम फेरीतील स्थान पक्के केले होते. त्याचबरोबर तमिम इक्बालनेही अर्धशतक केले होते. त्याचमुळे बांग्लादेशला कमी लेखने भारताला भारी पडू शकते.
तसेच बांग्लादेशचा नियमित कर्णधार शाकिब अल हसनने मागील सामन्यातून पुनरागमन केले आहे. पण त्याला मागील सामन्यात खास काही करता आले नव्हते. तरीही त्याच्यामुळे बांग्लादेश संघाच्या फलंदाजीला भक्कमपणा आला आहे. यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असेल.
कुठे होईल भारत विरुद्ध बांग्लादेश अंतिम सामना?
आज निदाहास ट्रॉफी स्पर्धेत भारत विरुद्ध बांग्लादेश संघात होणारा सामना आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे होणार आहे. तिरंगी मालिकेतील(निदाहास ट्रॉफी) हा अंतिम सामना असणार आहे.
किती वाजता सुरु होणार भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील अंतिम सामना?
आज भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी संध्याकाळी ६.३० वाजता नाणेफेक होईल.
कोणत्या टीव्ही चॅनेलवरून भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्याचे प्रसारण होईल?
भारत विरुद्ध बांग्लादेश संघात होणारा अंतिम सामना चाहत्यांना डी स्पोर्ट्स, डीडी स्पोर्ट्स आणि रिश्ते सिनेप्लेक्स या चॅनेलवरून पाहता येणार आहे. डी स्पोर्ट्स चॅनेलवरून इंग्लिश समालोचन करण्यात येणार आहे. तर रिश्ते सिनेप्लेक्स चॅनेलवरून हिंदी समालोचन होईल.
हा सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
आज होणाऱ्या भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील सामन्याचे ऑनलाईन प्रसारण जिओ टीव्ही लाईव्ह अॅपवर होणार आहे. या अॅपवर चाहत्यांना हा सामना ऑनलाईन पाहता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ:
भारत: रोहीत शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), केएल राहूल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), दिपक हूडा, वाॅशीगंटन सुंदर, य़ुझवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दल ठाकूर, जयदेव उनाडकत, मोहंमद सीराज, रीषभ पंत (यष्टीरक्षक)
बांग्लादेश: शाकिब अल हसन( कर्णधार), महमुदूल्लाह रीयाद, तमिम इक्बाल, सौम्या सरकार, इम्रूल कायेस, मुशफिकूर रहीम, नुरूल हसन सोहन, मेहेदी हसन मिराज, सब्बीर रहमान, मुस्तफिजूर रहमान, रूबेल हुसेन, अबू हैदर रोनी, अबू जायोद राही, अरूफुल हक आणि नाझमुल इस्लाम अपू