वेस्ट इंडिज संघाने दोनदा टी२० विश्वचषक जिंकला आहे. यावेळीही वेस्ट इंडिज विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. याचे कारण वेस्ट इंडिज हा एक असा संघ आहे जो कधीही काहीही करू शकतो. या संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू म्हणजे निकोलस पूरन. तो संघाचा उपकर्णधार आहे. मात्र, सध्या तो चांगल्या लयीत नाही.
तो आयपीएल २०२१मध्ये पंजाब किंग्ससाठी खेळत होता. मात्र, या हंगामात त्याची बॅट शांतच राहिली होती. पण पूरनला याबाबत फारशी काळजी नाही, तो म्हणाला की, टी२० विश्वचषकापूर्वी त्याचा फॉर्म त्याच्यासाठी अजिबात समस्या नाही. या हंगामात पूरनने १२ सामने खेळले त्यात त्याने फक्त ८५ धावा केल्या होत्या.
मी सर्वांना निराश केले
पूरन म्हणाला, “आयपीएलमधील आमच्या संघाचा प्रवास आता संपला आहे. माझ्यासाठीही आयपीएल आता संपले आहे. मी माझे लक्ष पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे वळवले आहे. मला माहित आहे की, मी सर्वांना खूप निराश केले. मला वाटते की धावा काढण्यासाठी मी खूप घाई केली होती आणि त्याची किंमत देखील मला मोजावी लागली. आता यावर मी काम करेन. मी नेटमध्ये चांगला सराव करतोय. मी कठोर परिश्रम करीन, त्यासाठीच्या योजना करीन. मला वाटत ही एक साधी बाब आहे.’
मी खराब फॉर्ममध्ये नव्हतोच
पूरनने असेही म्हटले की, देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा चांगला खेळ राहिला आहे आणि कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये, गयाना ऍमेझॉन वॉरियर्ससोबत खेळताना त्याचा उत्कृष्ट फॉर्म असे दाखवतो की आयपीएलमध्ये धावा न करणे ही एक किरकोळ घटना होती. पूरन म्हणाला की,” मी आयपीएलमध्ये खूप कमी चेंडू खेळले होते, त्यामुळे या खेळाला खराब फॉर्म म्हणता येणार नाही. तो पुढे म्हणाला, “मला कशाचीही चिंता नाही. माझा खेळ हा आत्मविश्वास आणि माझ्या ध्येयावर अवलंबून आहे. मी वेस्ट इंडिजसाठी खेळलेल्या शेवटच्या तीन मालिकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि नंतर सीपीएलमध्येही चांगली कामगिरी केली. ही एक प्रक्रियेची बाब असते. मला त्या प्रक्रिया पूर्ण करण्यावर विश्वास आहे. माझा आत्मविश्वास खूप चांगला आहे. माझ्या मनात कोणतीही शंका नाही.” पूरनने सीपीएलमध्ये गयाना संघाला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून दिली होती.





