बुधवारी (6 नोव्हेंबर) आसाम व्हॅली स्कूल ग्राऊंड, कोलकाता (Asaam Valley School, Kolkata) येथे 16 वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफी (Vijay Merchant Trophy) स्पर्धेत मेघालय विरुद्ध नागालँड (Meghalaya vs Nagaland) संघात सामना पार पडला.
या सामन्यात मेघालयच्या निर्देष बैसोयाने (Nirdesh Baisoya) भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) यांच्यासारखाच एका डावात 10 विकेट्स घेण्याचा एक अनोखा विक्रम केला आहे.
निर्देष हा मेघालय संघासाठी गेस्ट बॉलर म्हणून खेळतो. त्याने नागालँड विरुद्धच्या या सामन्यातील पहिल्या डावात नागालँडच्या सर्व 10 विकेट्स (10 Wickets in an Innings) घेतल्या. ही कामगिरी त्याने 21 षटकात फक्त 51 धावा देऊन पूर्ण केली आहे. त्याचबरोबर, यात त्याच्या 10 निर्धाव षटकांचा समावेश आहे.
निर्देषने 10व्या षटकातील 3ऱ्या चेंडूपासून विकेट्स घ्यायला सुरूवात केली. 10व्या षटकात त्याने प्रथम सावलिन कुमार मलिकला (Savline Kumar Malik) शुन्य धावेवर बाद केले. त्यानंतर त्याने कालांतराने नागालँडच्या खेळाडूंच्या विकेट घेतल्या. त्याने शेवटची विकेट 42व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घेतली.
निर्देषने नागालँडच्या हुटो तोशिहो अचहुमीला (Huto Toshiho Achahumi) बाद करत आपल्या 10विकेट्स पूर्ण केल्या आणि नागालँड संघाचा पहिला डाव 113 धावांवर संपुष्टात आणला.
नागालँडकडून या डावात श्रवण नागा रवीने (Shravan Naga Ravi) 112 चेंडूत सर्वाधिक 55 धावा केल्या. तर, केदुवहेटू के खरेइबूने (Keduvhetu K Khareibu) 20, रोहन यशपाल पारचंदाने (Rohan Yashpal Parchanda) 16 आणि सुजाल शंकर प्रसादने (Sujal Shankar Prasad) 14 धावांचे योगदान दिले.
त्यानंतर, मेघालयाकडून पहिल्या डावात फलंदाजीला येत निर्देषने चांगली कामगिरी केली. 100 चेंडूत त्याने 68 धावा केल्या. मात्र त्यांच्याकडून अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही. त्यामुळे मेघालयने पहिल्या डावात सर्वबाद 148 धावा केल्या.
यानंतर नागालँडचा संघ दुसऱ्या डावातही खास काही करु शकला नाही. त्यांचा दुसरा डाव 111 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे त्यांनी पहिल्या डावातील 35 धावांच्या पिछाडीसह मेघालयला 77 धावांचे आव्हान दिले. मात्र अटितटीच्या लढतीत मेघालयचा दुसरा डाव 68 धावांवरच संपुष्टात आल्याने नागालँडने 8 धावांनी विजय मिळवला.
निर्देषच्या 10 विकेट्सने चाहत्यांना आठवला कुंबळे
निर्देषच्या पहिल्या डावात 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना अनिल कुंबळेची आठवण आली. अनिल कुंबळेने 1999मध्ये दिल्लीत पाकिस्तानविरुद्ध (Against Pakistan) कसोटी सामन्यात एका डावात 74 धावा देत 10 विकेट्स घेतले होते. या सामन्यात त्याने भारताला 212 धावांनी विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले होते.






