Niroshan Dickwella :- लंका प्रीमियर लीग (LPL) 2024 दरम्यान कथित डोपिंग विरोधी उल्लंघनानंतर शुक्रवारी (16 ऑगस्ट) निरोशन डिकवेलाला क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निलंबित करण्यात आले आहे. श्रीलंका क्रिकेटच्या म्हणण्यानुसार त्याला तपासादरम्यान अनिश्चित काळासाठी बंदीचा सामना करावा लागू शकतो.
त्याचे हे निलंबन त्वरित लागू झाले असून पुढच्या नोटीपर्यंत तरी कायम राहणार असल्याचे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार लंका प्रीमियर लीग 2024 स्पर्धेदरम्यान खेळाची विश्वासार्हता टिकून राहण्यासाठी श्रीलंका अँटी डोपिंग एजन्सीने ही चाचणी घेतली होती. त्याचबरोबर त्यांनी असंही सांगितलं की श्रीलंका क्रिकेट बोर्डासह क्रीडा मंत्रालय आणि श्रीलंका डोपिंग एजन्सी कधीही देशांतर्गत स्पर्धांदरम्यान अशा चाचण्या घेऊ शकतात.
निरोशन हा गॅले मार्व्हल्सचा कर्णधार आहे
लंका प्रीमियर लीग 2024 मध्ये निरोशन डिकवेला गॅले मार्व्हल्सची जबाबदारी सांभाळत होता. नुकत्याच संपलेल्या लीगमध्ये, त्याची फ्रँचायझी राऊंड-रॉबिन टप्प्याच्या शेवटी गुणतालिकेत अव्वल स्थानावर होती. त्यांनी हंगामात खेळल्या गेलेल्या 8 पैकी 5 सामने जिंकले आणि फक्त 3 सामने गमावले होते. क्वालिफायर 1 मध्ये, त्यांनी जाफना किंग्सपेक्षा चांगली कामगिरी केली, परंतु महत्त्वपूर्ण लढतीत त्यांना 9 विकेट्सने दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.
निरोशनची स्पर्धेत खराब कामगिरी
दरम्यान निरोशन डिकवेलाची या स्पर्धेतील कामगिरी काही खास नव्हती. त्याने 10 डावात 18.40 च्या माफक सरासरीने केवळ 184 धावा केल्या. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 153.33 होता. यादरम्यान त्याने 2 अर्धशतके झळकावली होती.
निरोशन डिकवेलाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 54 कसोटी, 55 वनडे आणि 28 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या 96 डावांमध्ये त्याने 30.97 च्या सरासरीने आणि 66.46 च्या स्ट्राईक रेटने 2757 धावा केल्या आहेत. वनडे सामन्यांच्या 52 डावांमध्ये त्याच्या नावावर 1604 धावा आहेत. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निरोशन डिकवेलाने 131.14 च्या स्ट्राइक रेटने 480 धावा केल्या आहेत. डिकवेलाने मार्च 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध हॅगले ओव्हल येथे शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
महत्त्वाच्या बातम्या-
पुजारासाठी टीम इंडियाचे दरवाजे नेहमीसाठी बंद? माजी क्रिकेटर म्हणाला, “गंभीर असतानाही…”
SA20: कार्तिक, राशिद खान, कॉनवेसारखे स्टार खेळाडू सहभागी! कधी होणार स्पर्धा?
विनेशमुळे भारताचे नुकसान, कुस्तीमध्ये 4 पदके गमावली? WFI अध्यक्षांच्या वक्तव्याने खळबळ