आगामी टी२० विश्वचषकाची सुरुवात १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये होणार आहे. विश्वचषकासाठी गुरुवारी (७ ऑक्टोबर) २० सामना अधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी विश्वचषकाच्या पहिली फेरी आणि त्यानंतर सुपर १२ फेरीसाठी नियुक्त केले गेले आहेत. यादीत ४ सामना रेफरी आणि १६ पंचांचा समावेश आहे. या यादीत भारताचे एकमेव, पंच नितिन मेनन यांना संधी दिली गेली आहे.
टी २० विश्वचषकासाठी निवडल्या गेलेल्या २० सामना अधिकाऱ्यांपैकी ३ पंच असे आहेत, ज्यांच्यासाठी हा विश्वचषक त्यांच्या कारकिर्दीतील सहावा विश्वचषक ठरणार आहे. या ३ पंचांमध्ये पाकिस्तानचे अलीम डार, मरायस इरॅसमस आणि रॉड टकर यांचा समावेश आहे. विश्वचषकासाठी १६ पंचांचा नियुक्त केल्यामुळे प्रत्येक सामन्यात वेगवेगळे पंच दिसण्याची शक्यता आहे. टी२० विश्वचषकाचे सामने ओमानमधील मस्कट आणि यूएईतील अबु धाबी, शारजाह आणि दुबई या ३ वेगवेगळ्या ठिकाणी खेळले जाणार आहेत.
विश्वचषकातील पहिला सामना ओमान आणि पापुओ न्यू गीनियामध्ये होणार असून, या सामन्यासाठी श्रीलंकेचे कुमार धर्मसेना पंचाची भूमिका पार पाडणार आहेत. तसेच अलीम डार आणि इरॅसमस यांना सुपर १२ फेरीच्या पहिल्या सामन्यात पंचाच्या भूमिकेत पाहिले जाऊ शकते. विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यासाठी आणि अंतिम सामन्यासाठी पंच कोण असणार? याबाबत आयसीसीने अध्याप कसलीही माहिती दिलेली नाही. काही दिवसांनंतर याबाबत माहिती दिली जाईल.
टी२० विश्वचषकासाठी निवडले गेलेले सामना अधिकारी
सामना रेफरी : डेविड बून, जेफ क्रो, रंजन मदुगले, जवागल श्रीनाथ.
पंच : क्रिस ब्राउन, अलीम डार, कुमार धर्मसेना, मराइस इरैसमस, क्रिस गॅफनी, माइकल गफ, एड्रियन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबोरो, नितिन मेनन, अहसन रजा, पॉल राइफल, लँग्टन रुसेरे, रॉड टकर, जोएल विल्सन, पॉल विल्सन.
विश्वचषकातील सामने दोन ग्रुपमध्ये खेळले जाणार आहेत. यामध्ये ग्रुप १ मध्ये, ऑस्ट्रेलिया, वेस्टइंडीज, दक्षिण अफ्रिका, इंग्लंड आणि दोन क्वॉलिफाय झालेल्या संघांचा समावेश असणार आहे. तसेच ग्रुप २ मध्ये, भारत, पाकिस्तान, न्यूझीलँड, अफगानिस्तान आणि क्वॉलिफाय झालेल्या दोन संघांचा समावेश असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
गोलमाल है भाई…! एकीकडे पटापट विकेट्स जात असताना राजस्थानच्या ताफ्यात सुरू होता भलताच गोंधळ
टी२० विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानचा रडीचा डाव, जर्सीवरुन हटवले भारताचे नाव; फोटो व्हायरल
मी रडू की हसू? राहुलचा क्लासिकल षटकार पाहून ब्रावोने दिली अशी प्रतिक्रिया, व्हिडिओ व्हायरल