गुरुवारी (७ ऑक्टोबर) आयपीएल स्पर्धेत डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. यामध्ये दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाला हा सामना जिंकणे आवश्यक होते. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघातील गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी पूर्ण जोर लावला आणि या संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान राजस्थान रॉयल्स संघाच्या डगआऊटमध्ये अशी काही मजेशीर घटना घडली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून शुबमन गिलने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. तर व्यंकटेश अय्यरने ३८ आणि राहुल त्रिपाठीने २१ धावांचे योगदान दिले होते. २० षटक अखेर कोलकाता नाईट रायडर्स संघाला ४ बाद १७१ धावा करण्यात यश आले होते.
राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात गडबड
प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्स संघाची फलंदाजी सुरू असताना राजस्थान रॉयल्स संघाच्या डगआऊटमध्ये गडबड सुरू होती. या डावातील दुसऱ्याच षटकात संजू सॅमसन बाद होऊन माघारी परतला होता. यानंतर जे झाले ते पाहून कोणालाही हसू आवरणार नाही. संजू सॅमसन बाद झाल्यानंतर शिवम दुबे फलंदाजी करण्यासाठी मैदानात जात होता. परंतु कुमार संगकाराने त्याला थांबवून अनुज रावतला फलंदाजीला पाठवले.
अनुज रावतने मैदानात प्रवेश केला, इतक्यात बाद होऊन माघारी परतत असलेल्या संजू सॅमसनने अनुज रावतला मैदानाबाहेर जाण्यास सांगितले. तसेच शिवम दुबेला फलंदाजीला येण्यास सांगितले. शेवटी २ गडी बाद झाल्यानंतर शिवम दुबेलाच फलंदाजीला जावे लागले. या मजेशीर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
येथे पाहा व्हिडिओ-
https://www.iplt20.com/video/245238/total-confusion-dube-walks-in-walks-out-and-finally-bats
राजस्थान रॉयल्स संघातील फलंदाजांचा फ्लॉप शो
कोलकाता नाईट रायडर्स संघाने दिलेल्या १७२ धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघातील सलामीवीर फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. राजस्थान रॉयल्स संघाकडून राहुल तेवतियाने सर्वाधिक ४४ तर शिवम दुबेने १८ धावांची खेळी केली. इतर कुठल्याही फलंदाजाला दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही. राजस्थान रॉयल्स संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ८५ धावांवर संपुष्टात आला. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाने या सामन्यात ८६ धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानचा रडीचा डाव, जर्सीवरुन हटवले भारताचे नाव; फोटो व्हायरल
मी रडू की हसू? राहुलचा क्लासिकल षटकार पाहून ब्रावोने दिली अशी प्रतिक्रिया, व्हिडिओ व्हायरल
मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करत २०० धावा केल्या तर काय असेल प्ले-ऑफचे समीकरण?