भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियात नितीश कुमार रेड्डीला पदार्पणाची संधी मिळू शकते. नितीश हा गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहे. त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
नितीशनं भारतीय संघासाठी तीन टी20 सामने खेळले आहेत. तो आता कसोटी खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’मधील एका वृत्तानुसार, नितीश कुमारला पर्थ कसोटीत पदार्पणाची संधी मिळू शकते. तो संघात अष्टपैलू हार्दिक पांड्याची पोकळी भरून काढू शकतो. नितीशनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करण्यासोबतच विकेट्सही घेतल्या आहेत.
नितीश कुमार रेड्डीनं आतापर्यंत 23 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्यानं 779 धावा केल्या. नितीशनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये एक शतक आणि 2 अर्धशतकंही झळकावली आहेत. एवढंच नव्हे तर, प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याच्या नावे 56 विकेट्सही आहेत. एका सामन्यात 119 धावांत 8 बळी घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. नितीशनं 22 लिस्ट ए सामन्यात 403 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावे 14 विकेट्स आहेत.
नियमित कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला गेलेला नाही. त्याची पत्नी रितिका हिने नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे तो पर्थ कसोटीत खेळणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. बुमराह संघाचा उपकर्णधार आहे. यासह टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुबमन गिल जखमी झाला आहे. त्यामुळे तो पर्थ कसोटीतूनही बाहेर होऊ शकतो. त्याच्या अनुपस्थितीत देवदत्त पडिक्कलला संधी मिळेल, असं बोललं जात आहे.
हेही वाचा –
आयपीएल मेगा लिलाव लाईव्ह कधी आणि कोणत्या चॅनलवर पाहता येणार? सर्वकाही जाणून घ्या
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारताने पाकिस्तानमध्ये गेलं पाहिजे? माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य
शुबमन गिलच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार? विराट कोहलीसह ही नावं चर्चेत