भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या टी20 मालिकेतील पहिला सामना ग्वाल्हेर येथे खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियानं तयारी सुरू केली आहे.
या सामन्यात नितीश कुमार रेड्डी याला भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. त्यानं आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. नितीश इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळतो. त्यानं तेथंही आपल्या कामगिरीनं स्वत:ला सिद्ध केलं आहे.
सध्या टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल खेळाडूंसोबत नेट्समध्ये घाम गाळत आहेत. ते नेट्समध्ये नितीशसोबत दिसले. तो सरावात खूप मेहनत घेताना दिसतोय. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर नितीशला या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. त्यानं आयपीएल 2024 मध्ये 13 सामने खेळले. या दरम्यान त्यानं 3 बळीही घेतले होते. नितीशनं 2023 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं.
नितीश हा अष्टपैलू खेळाडू आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा आतापर्यंतचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. नितीशनं 20 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 627 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्यानं एक शतक आणि दोन अर्धशतकं झळकावली. या फॉरमॅटमध्ये त्यानं 54 विकेट्सही घेतल्या आहेत. एका डावात 53 धावांत 5 बळी ही नितीशची सर्वोत्तम कामगिरी होती. याशिवाय त्यानं 22 लिस्ट ए सामन्यात 403 धावा केल्या आहेत. तसेच 14 विकेट्स घेतल्या आहेत. नितीशनं 20 देशांतर्गत टी20 सामन्यात 3 विकेट घेतल्या आहेत. तसेच 395 धावा केल्या.
नितीशला बांगलादेशविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं, तर तो कमाल करू शकतो. फलंदाजीसोबतच नितीश गोलंदाजीतही योगदान देऊ शकतो. नितीशमुळे बांगलादेशची डोकेदुखी वाढू शकते. उजव्या हाताचा मध्यम वेगवान गोलंदाज नितीश पहिल्यांदा 2017-18 च्या विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये प्रकाशझोतात आला होता. आंध्र प्रदेशविरुद्ध त्यानं त्रिशतक ठोकलं होतं. नितीशनं 441 चेंडूत 345 धावा केल्या होत्या.
हेही वाचा –
गौतम गंभीर आणि राहुल द्रविड यांच्या कोचिंगमधील 5 मोठे फरक, सविस्तर जाणून घ्या
श्रीलंका-पाक सामन्यात नवा राडा, रुमाल पडल्यानं फलंदाजाला जीवदान; नियम समजून घ्या
“जोपर्यंत धोनीची इच्छा आहे, तोपर्यंत आयपीएलचे नियम बदलत राहतील”, दिग्गज क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा