ग्लासगो: येथे सुरु असणाऱ्या जागतीक बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू के.श्रीकांत याने रशियाच्या सर्जेई सिरन्ट याचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. श्रीकांतने पहिला सेट २१-१३ तर दुसरा सेट २१-१२ असा सहज जिंकला. या विजयासह श्रीकांतने दुसऱ्या फेरीत प्रवेश केले.
पहिल्या सेटमध्ये चांगल्या लयीत असण्याचे चिन्ह देत श्रीकांतने सर्जेई सिरन्टवर ८-५ अशी बढत घेतली. या नंतर त्याने विरोधी खेळाडूला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. पहिला सेट २१-१३ असा खिशात घातला.
दुसऱ्या सेटमध्ये देखील श्रीकांतचा दबदबा राहिला. या सेटमध्ये श्रीकांतने विरोधी खेळाडूला थोडीही संधी ना देता ८-३ अशी आघाडी मिळवली. या नंतर १२-६ असा तो आघाडीवर राहिला. शेवटी हा सेटही श्रीकांतने २१-१२ असा जिंकला.
हा सामना जिंकण्यासाठी किदांबी श्रीकांतला फक्त २८ मिनिट लागले.