मुंबई । ऑस्ट्रेलिया येथे ऑक्टोंबर-नोव्हेंबर दरम्यान टीट्वेंटी विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धे संबंधीचा अंतिम निर्णय जुलैमध्ये घेण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात बुधवारी दुबई येथे आयसीसीची महत्त्वपूर्ण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मागील बैठकीत दहा जून रोजी या स्पर्धेविषयी निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले होते. यासोबतच न्यूझीलंड येथे पुढील वर्षी होणाऱ्या महिला विश्वचषक स्पर्धेविषयी कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
आयसीसी एक महिनाभर संपूर्ण जगात कोरोनाची परिस्थिती कशी आहे, याचा अंदाज घेईल आणि नंतरच या दोन्ही स्पर्धांविषयी आयसीसी अंतिम निर्णय घेणार आहे.
आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनू सहानी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलताना म्हणाले की, “आम्ही आमचे सदस्य, प्रसारक, भागीदार, सरकार आणि खेळाडूंशी सतत सल्लामसलत करत आहोत. स्पर्धेविषयी खूप विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल. आम्हाला हा निर्णय घेण्याची एकच संधी मिळेल, त्यामुळे त्यात चुकण्याची कोणतीही संधी नाही.”