चौथ्या कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारतीय संघ दुसऱ्या डावात ४६६ धावांवर बाद झाला. सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने सर्वाधिक १२७ धावा केल्या. याशिवाय चेतेश्वर पुजाराने ६१, शार्दुल ठाकूरने ६० आणि रिषभ पंतने ५० धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या सलामीवीरांनी नाबाद ७७ धावा केल्या. या सामन्याचा अजून शेवटचा दिवस बाकी आहे आणि इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी अजून २९१ धावांची आवश्यकता आहे. पण इंग्लंडचा संघ कसोटी इतिहासात इतके मोठे लक्ष्य गाठताना यशस्वी होऊ शकलेला नाही.
इंग्लडने २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध लीड्स येथे ९ बाद ३६२ धावा करून सर्वात मोठे लक्ष्य गाठले होते. परंतु भारतीय संघाचे लक्ष्य याहूनही ६ धावांनी जास्त आहे. म्हणजेच हा चौथा सामना जिंकण्यासाठी इंग्लड संघाला त्यांच्या कसोटी इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. तसे तर, यापूर्वी इंग्लंडच्या संघाने ओव्हलच्याच मैदानावर भारताविरुद्ध कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात ३६९ धावा केल्या होत्या. परंतु त्यांना तो सामना जिंकता आला नव्हता.
पीटरसनने शतक करत सामना राखला होता अनिर्णीत
भारत आणि इंग्लंड यांच्यात २००७ मध्ये ओव्हलवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात ६६४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लिश संघ केवळ ३४५ धावा करू शकला होता. पुढे भारतीय संघाने दुसरा डाव ६ विकेट्स १८० धावांवर घोषित केला होता. अशाप्रकारे इंग्लंडला विजयासाठी ५०० धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरादाखल इंग्लंड संघाने ६ विकेट्सच्या मोबदल्यात ३६९ धावा करत सामना अनिर्णित सोडवला होता. यादरम्यान केविन पीटरसनने १०१ धावांची शानदार खेळी खेळली होती. इयान बेलनेही ६७ धावा केल्या होत्या.
भारताच्या ३५० पेक्षा जास्त धावांच्या प्रत्युत्तरात जिंकलेला नाही कोणताच संघ
केवळ इंग्लंड संघच नव्हे तर, भारताविरुद्धच्या कसोटीत कोणत्याही संघाला ३५० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठताना विजय मिळवता आलेला नाही. भारताविरुद्ध सर्वात मोठे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने १९७७ मध्ये पर्थ येथे साध्य केले होते. ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या अखेरच्या डावात ८ विकेट गमावून भारताचे ३३९ धावांचे लक्ष्य गाठले होते. यावेळी टोनी मानने १०५ धावा केल्या होत्या. याशिवाय पीटर तोहेनेही ८३ धावांची खेळी खेळली होती. भारताकडून बिशनसिंग बेदी यांनी ५ बळी घेतले होते. हा सामना ऑस्ट्रेलियाने २ विकेट्सने जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
सरासरी गोलंदाजी, फ्लॉप फलंदाजी, आता ‘या’ गोष्टीतही चुकला; अंतिम कसोटीत जडेजाला नारळ पक्का!
अतिविश्वास भोवणार? सातत्याने अपयशी होऊनही प्रशिक्षकांना रहाणेवर विश्वास, केले मोठे भाष्य