आयपीएल 2024 मध्ये आता फक्त एकच सामना शिल्लक आहे. 26 मे रोजी चेन्नई येथे कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात या हंगामाचा अंतिम सामना खेळला जाईल.
या दोन संघांसह राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनीही प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. राजस्थानला क्वालिफायर 2 मध्ये पराभव पत्करावा लागला. तर बंगळुरूचा संघ एलिमिनेटरमध्ये राजस्थानकडून पराभूत झाला. प्लेऑफमध्ये आरसीबीला पराभूत करणं राजस्थानला महागात पडलं आहे. याचं कारण म्हणजे, आता एक वाईट योगायोग समोर आलाय, जो सर्वांना आश्चर्यचकित करू शकतो.
वास्तविक, आरसीबीबाबत एक खास योगायोग समोर आला आहे. 2010 पासून आतापर्यंत ज्या संघानं प्लेऑफमध्ये बंगळुरूचा पराभव केला, तो संघ त्या हंगामात चॅम्पियन बनू शकलेला नाही! आयपीएल 2024 मध्येही हा ट्रेंड दिसून आला. राजस्थाननं एलिमिनेटरमध्ये आरसीबीचा पराभव केला, मात्र नंतर क्वालिफायर 2 मध्ये हैदराबादकडून पराभूत होऊन ते स्पर्धेबाहेर पडले.
हे असं 2010 पासून सुरू आहे. त्यावर्षी मुंबई इंडियन्सनं पहिल्या उपांत्य फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत केलं होतं. परंतु नंतर अंतिम सामन्यात मुंबईला चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. यानंतर बंगळुरूचा संघ 2015 मध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरला. त्या हंगामात चेन्नईनं क्वालिफायर 2 मध्ये बंगळुरूचा पराभव केला. पण नंतर अंतिम सामन्यात चेन्नईचा मुंबई इंडियन्सकडून पराभव झाला.
2020 ते 2022 पर्यंत, आरसीबीनं सलग तीन हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश केला. परंतु या कालावधीत संघाला अनुक्रमे सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागला. हे संघ बंगळुरूला पराभूत करण्यात यशस्वी झाले, पण ते त्या हंगामात चॅम्पियन बनू शकले नाहीत. आता अशीच परिस्थिती आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सची झाली.
आयपीएलच्या या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पहिल्या 8 सामन्यात फक्त 1 विजय नोंदवला होता. पण त्यानंतर त्यांनी सलग 6 सामने जिंकत जोरदार पुनरागमन केलं आणि प्लेऑफमध्ये जागा निश्चित केली. तथापि, एलिमिनेटरमध्ये त्यांची कामगिरी खराब राहिली आणि संघ पुन्हा एकदा विजेतेपदापासून वंचित राहिला.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस आहे का? पावसानं खोळंबा घातला तर कोणता संघ बनेल चॅम्पियन?
काय सांगता! टी20 विश्वचषकात खेळणारा एकही भारतीय खेळाडू आयपीएलच्या फायनलमध्ये नाही!
फायनलमध्ये कोलकाताशी भिडणार हैदराबाद, कोणाचं पारडं जड जाणून घ्या हेड टू हेड रेकाॅर्ड