प्रो कबड्डी पहिल्या पर्वापासूनच नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आलेली आहे. मागील पर्वातही प्रो कबड्डीने ऐतिहासिक पाऊल उचलले,ते म्हणजे महिला कबड्डीपटूंसाठी ‘वूमेन्स कबड्डी चॅलेंज ‘ सुरु करण्याचे.
भारतीय कबड्डीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदले जावे असंच हे पाऊल होते. महिला कबड्डीपटूंनीही अत्यंत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आम्हीही कुठेही पुरुषांपेक्षा कमी नाही हे दाखवून दिले. अभिलाषा म्हात्रे , ममता पुजारी, तेजस्विनी बाई यांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
डब्लूकेसीच्या सामन्यांना प्रेक्षकांनीही पसंती दाखविली.पहिल्या दोन सामन्यांतच डब्लूकेसीने विवरशिप चे सर्व विक्रम मोडीत काढीत ‘महिलांचा सर्वाधिक पहिला जाणारा खेळ’ होण्याचा मान मिळवला! एव्हढेच नव्हे तर,संपूर्ण UAEFA युरो कपला मिळालेली विवरशिप ही पहिल्या दोन सामन्यांना मिळालेल्या विवरशिप पेक्षा कमी होती; यावरूनच डब्लूकेसीच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. आयोजकांनीही ही केवळ सुरवात असल्याचे सांगितले व पुढे डब्लूकेसीचा विस्तार करण्याची मनीषा व्यक्त केली.
मात्र यावर्षीच्या प्रो कबड्डीच्या वेळापत्रकात डब्लूकेसीचा कुठेही उल्लेख नाही. पुरुषांच्या लीगमध्ये मात्र ४ संघ नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पुरुषांच्या लीगमधील संघ वाढणे ही कबड्डीसाठी चांगलीच गोष्ट आहे. मात्र त्यासाठी डब्लूकेसीचा बळी तर नाही देण्यात आला, अशी शंका घेण्यास वाव आहे. जर ही शंका खरी असेल तर पुन्हा एकदा पुरुषप्रधान संस्कृतीचा विजय झाला असे म्हणण्यास काहीही हरकत नाही.
अनुप कुमारला मिळत असेलेली प्रसिद्धी योग्यच आहे पण तितक्याच प्रतिभावान असलेल्या ‘अभिलाषा म्हात्रे’ यांच्या प्रतिभेला आपण न्याय देतो आहोत का? काशिलिंग आडकेची ‘यशोगाथा’ निश्चितच प्रेरणादायी आहे मात्र तितकाच प्रेरणादायी असणारा ‘दीपिका जोसेफ’ यांचा संघर्ष किती जणांना माहित आहे?
असो,आपली ही शंका चुकीची ठरावी आणि येत्या काळात महिलांसाठी स्वतंत्र लीग सुरु करून केवळ कबड्डीपटूच नाही तर सर्वच महिला खेळाडूंच्या पंखांमध्ये नवीन बळ देण्याची सुबुद्धी आयोजकांना लाभावी हीच सदिच्छा!!!
-शारंग ढोमसे (टीम महा स्पोर्ट्स )