आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी, ICC) गेल्या काही महिन्यांपासून महिभरातील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूला महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार (ICC Player Of The Month) देण्यास सुरुवात केली आहे. दर महिन्याला एक पुरुष आणि एक महिला क्रिकेटपटू या पुरस्काराचा मानकरी ठरतो. याप्रकारे दरवर्षाच्या शेवटी आयसीसीकडून वर्षभरातील सर्वश्रेष्ठ खेळाडूलाही पुरस्कार देऊन गौरवले जाते. यातीलच वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटूच्या पुरस्कारा (ICC Test Player Of Year) साठी आयसीसीने ४ क्रिकेटपटूंची निवड (Nominees For ICC Test Player Of Year) केली असून त्यांची नावेही जाहीर केली आहेत.
डिसेंबर महिन्याअंती आयसीसीने ही यादी घोषित केली असून यामध्ये एका भारतीय क्रिकेटपटूचाही समावेश आहे.
आयसीसीने निवडलेल्या ४ क्रिकेटपटूंमध्ये इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट (Joe Root), भारताचा अष्टपैलू आर अश्विन (R Ashwin), न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज कायल जेमिसन (Kyle Jemieson) आणि श्रीलंकेचा कसोटी कर्णधार दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne) यांचा समावेश आहे. आता याच ४ क्रिकेटपटूंमधून एकाची वर्षभरातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड केली जाईल.
रूटसाठी यंदाचे वर्ष मोठ्या स्वप्नाप्रमाणे राहिले आहे. त्याने २०२१ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये धावांचा रतीब घातला आहे. १५ कसोटी सामने खेळताना ६ शतके ठोकत त्याने १७०८ धावा चोपल्या आहेत. यासह कसोटी क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात तो १७०० धावांचा टप्पा ओलांडणारा तिसराच फलंदाज ठरला आहे. फक्त मोहम्मद यूसूफ आणि विवियन रिचर्ड्स हे या विक्रमात त्याच्या पुढे आहेत. त्यातही त्याचे भारताविरुद्धच्या चेन्नई कसोटीतील द्विशतकीय खेळी त्याच्यासाठी अविस्मरणीय ठरली. या सामन्यात त्याने भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्याचा सामना करताना २१८ धावा फटकावल्या होत्या.
दुसरीकडे अष्टपैलू अश्विनने या वर्षात ५२ विकेट्स आणि ३३७ धावांची कामगिरी करत या पुरस्काराचे नामांकन मिळवले आहे. विशेष म्हणजे केवळ ८ कसोटी सामने खेळताना त्याने ही कामगिरी केली आहे.
हेही वाचा- “तर पंचांच्या चुकीच्या यादीत सामील झालो असतो आणि मॅच फी कापली असती”, मयंकची विकेटबद्दल प्रतिक्रिया
यंदाच्या वर्षी भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघाचे विशेष आकर्षण ठरला वेगवान गोलंदाज कायल जेमिसन. जेमिसनने भारताच्या अनुभवी फलंदाजांनाही आपल्या भेदकपुढे गुडघे टेकायला भाग पाडत भारतीय चाहत्यांचे लक्ष वेधले होते. याच जेमिसनचे केवळ भारताविरुद्धचेच नव्हे तर संपूर्ण वर्षभरातील प्रदर्शन दमदार राहिले आहे. त्याने यंदाच्या वर्षात कसोटीत ५ सामने खेळताना २७ विकेट्स काढल्या आहेत.
याशिवाय २०२१ मधील सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटूचे नामांकन मिळवणाऱ्या श्रीलंकन क्रिकेटपटू करूणारत्नेने ७ सामन्यात ९०२ धावांची कामगिरी केली आहे. ६९ च्या सरासरीने फलंदाजी करताना ४ शतके करत त्याने या धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेतून कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमींच्या हृदयाचा ठोका चुकवणारी बातमी
“तर पंचांच्या चुकीच्या यादीत सामील झालो असतो आणि मॅच फी कापली असती”, मयंकची विकेटबद्दल प्रतिक्रिया
‘सलामीवीर’ राहुलच्या तळपत्या बॅटची जादू द. आफ्रिकेतही दिसली, शतक करत मोठ्या दिग्गजांना मागे टाकले
हेही पाहा-