हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) मध्ये एकही विजय न मिळवणारा एकमेव संघ नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी अजूनही पहिल्या गुणाच्या शोधात आहे. शनिवारी डबल हेडरच्या दुसऱ्या लढतीत नॉर्थ ईस्ट युनायटेड आणि एफसी गोवा हे जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर भिडतील. प्ले ऑफमधील पहिल्या सहा क्रमांकामध्ये एफसी गोवा सध्या शेवटच्या क्रमांकावर आहेत आणि सातव्या क्रमांकावर असलेल्या चेन्नईयन एफसी व त्यांच्यात केवळ दोन गुणांचे अंतर आहे. त्यामुळे नॉर्थ ईस्ट युनायटेडवर दणदणीत विजय मिळवून गोवा प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के करण्याच्या निर्धारात आहेत.
घरच्या मैदानावर झालेल्या चारपैकी तीन सामन्यांत एफसी गोवाने विजय मिळवला आहे. बंगळुरू एफसीविरुद्धचा 2-0 असा पराभव वगळल्यास एफसी गोवाने घरच्या प्रेक्षकांना निराश केलेले नाही. मागील आठवड्यात कार्लोस पेनाच्या संघाने ओडिशा एफसीवर 3-0 असा विजय मिळवला आहे. नाओ सदौईने या सामन्यात तीनही गोलमध्ये योगदान दिले. त्याने स्वतः एक गोल केला, तर दोन गोलसाठी सहाय्य केले. त्याने 9 सामन्यांत 8 गोलसाठी योगदान दिले आहे. अलव्हारो व्हॅजकेझने मागील सामन्यात यंदाच्या पर्वातील पहिला गोल नोंदवला होता. एडू बेडिया याही एका सामन्याच्या निलंबनानंतर उद्याच्या लढतीसाठी उपलब्ध असणार आहे.
”मागील आठवड्यात ओडिशा एफसीविरुद्ध केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती आम्ही या सामन्यात करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. नॉर्थ ईस्ट युनायटेडने अद्याप एकही सामना जिंकलेला नाही, हे ड्रेसिंग रुममधील प्रत्येकाला माहित आहे, परंतु त्याने फार फरक पडत नाही. त्यांचे कोच नवीन आहेत आणि ते पहिल्या गुणाच्या शोधात आहेत. त्यामुळे त्यांना कमी न लेखता 3 गुण मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत,”असे गोवाचे प्रशिक्षक कार्लोस पेना म्हणाले.
नॉर्थ ईस्ट युनायटेडला अद्याप एकही गुण मिळवता आलेला नाही आणि त्यांनी मागील सामन्यात नवीन प्रशिक्षक व्हिंसेन्झो ऍनेसे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळ केला, परंतु चेन्नईयन एफसीने 7-3 अशा फरकाने त्यांचा धुव्वा उडवला. पण, या सामन्यात एक सकारात्मक गोष्ट घडली आणि ती म्हणजे नॉर्थ ईस्टने 3 गोल केले. स्ट्रायकर विलमर जॉर्डन याने यंदाच्या पर्वातील पहिला गोल मागच्या सामन्यात केला. रोमैन फिलिपोतिआक्स, रोचार्झेला यांनीही गोल केले. पण, त्यांना चेन्नईयनचे वादळ रोखता आले नाही.
”मागील सामन्यातील पराभवाचा मी विचार करत नाही. पुढील सामना जिंकण्याचे माझे लक्ष असते आणि त्यासाठी संघाच्या कामगिरीत सुधारणा करण्यावर माझा भर असतो. मी कारकीर्दित आतापर्यंत काम केलेल्या क्लब्सनी काहीतरी यश मिळवून दाखवले आहे. मी सर्वोत्तम देण्याचा नेहमी प्रयत्न करतो. माझा स्वतःवर विश्वास आहे आणि एकेक पाऊल पुढे टाकणे मला आवडते. त्याने संघाला मोठ्या ध्येयाकडे जाण्यास मदत मिळते. त्यामुळे सलग नऊ पराभव झाल्यानंतर लोक काम म्हणतात याचा मी विचार करत नाही,”असे अॅनेसे म्हणाले.
हिरो आयएसएलमध्ये दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध १६ सामने खेळले आहेत आणि त्यापैकी निम्मे ड्रॉ राहिले आहेत. एफसी गोवाने पाच, तर नॉर्थ ईस्ट युनायटेडने तीन विजय मिळवले आहेत. मागील पर्वात एक विजय व एक ड्रॉ निकालासह नॉर्थ ईस्ट युनायटेड गोवाविरुद्ध अपराजित राहिला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
89 वर्षांपूर्वी आजच लालाजींनी भारतीयांना दाखवलेला ‘तो’ ऐतिहासिक क्षण
बंगळुरू एफसी आणि जमशेदपूर एफसी हे दोन्ही संघर्ष करणारे संघ समोरासमोर