नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीने शनिवारी (24 डिसेंबर) इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल)मधील पहिल्या विजयाची नोंद केली. सलग 10 पराभवानंतर आज नॉर्थ ईस्टने 1-0 अशा फरकाने एटीके मोहन बागानचा पराभव केला. कर्णधार जॉर्डन विलमार गिलने केलेला गोल निर्णायक ठरला. विजयानंतर नॉर्थ ईस्ट युनायटेडचे खेळाडू भावनिक झालेले दिसले, कर्णधार जॉर्डन मैदानावर डोक टेकवून रडला.
आता गमवायला काहीच उरलेले नाही आणि त्यामुळे उर्वरित सामन्यांत सर्वोत्तम देण्याच्या निर्धाराने नॉर्थ ईस्ट युनायटेडचा संघ मैदानावर उतरला. एटीके मोहन बागानचे तगडे आव्हान समोर असले तरी नॉर्थ ईस्टने पहिल्या 20 मिनिटांत दबदबा राखताना दोन ऑन टार्गेट प्रयत्न केले. आजच्या लढतीपूर्वी उभय संघांमध्ये झालेल्या 7 पैकी पाच सामन्यांत मोहन बागानने विजय मिळवले होते, नॉर्थ ईस्टने एक विजय मिळवलेला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातही तालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मोहन बागानचे पारडे जड मानले जात होते. पण, नॉर्थ ईस्टने सुरुवात चांगली केली. 22व्या मिनिटाला विलमार जॉर्डन गिलने एटीकेच्या ब्रेंडन हॅमिलला चकवा दिला आणि चेंडू गोल जाळीच्या दिशेने मारला. गोरक्षकांच्या हाताबाहेर तो होता, परंतु पोस्टला लागून गिलचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. नॉर्थ ईस्ट युनायटेडला आघाडी मिळता मिळता राहिली.
प्रग्यान गोगोईने 29व्या मिनिटाला बॉक्सबाहेरून सुरेख प्रयत्न केला. अर्ध्या तासांच्या खेळात मोहन बागानकडून लिस्टन कोलासोचा प्रयत्न सोडल्यास नॉर्थ ईस्ट युनायटेडचे वर्चस्व दिसले. पण अखेरच्या काही मिनिटांत मोहन बागानकडून पलटवार झाला. पहिल्या हाफमध्ये त्यांनी 3 ऑन टार्गेट प्रयत्न केले, परंतु गोल करण्यात अपयशी ठरले. 45 मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना गोलशून्य बरोबरीवर समाधानी रहावे लागले. मध्यंतरानंतर मोहन बागानच्या खेळाची धार तीव्र झाली अन् 52व्या मिनिटाला दिमित्री पेट्राटोसच्या पासवर लिस्टन कोलासोने पेलन्टी क्षेत्रातून सलग दोन आक्रमण केले, परंतु नॉर्थ ईस्टचा गोलरक्षक मिर्शाद मिचूने तितकाच सुरेख बचाव केला.
नॉर्थ ईस्ट युनायटेडने हिरो आयएसएलच्या यंदाच्या पर्वात प्रथमच आघाडी घेतली. कर्णधार जॉर्डन विलमार गिलने 69व्या मिनिटाला एमिल बेन्नीने पास केलेला चेंडू हेडरद्वारे गोल जाळीत पाठवला. पहिल्या हाफमध्ये गिलचाच प्रयत्न पोस्टला लागून अयशस्वी ठरला, परंतु यावेळेस त्याने मोहन बागानच्या गोलरक्षकाला चकवले. या गोल नंतर नॉर्थ ईस्टचे खेळाडू जोरदार सेलिब्रेशन करताना दिसले. मोहन बागानकडून बरोबरीचा गोल करण्याचा प्रयत्न झाला, परंतु यजमानांचे बचावपटू त्यासाठी तयार होते. या गोलने नॉर्थ ईस्टचा आत्मविश्वास प्रचंड वाढला अन् त्यांच्याकडून सातत्याने प्रयत्न होताना दिसले. दुसऱ्यांदा त्यांचा एका गोल पोस्टला लागला. 90+2 मिनिटाला मोहन बागानकडून बरोबरीचा प्रयत्न झाला, पण गोलरक्षक तो रोखण्यासाठी तयार होता.
𝐕𝐈𝐂𝐓𝐎𝐑𝐘! 🥳
This is what it feels like. ❤️🤍🖤#NEUATKMB #NEUFC #StrongerAsOne #8States1United pic.twitter.com/ALg9YEiPeX
— NorthEast United FC (@NEUtdFC) December 24, 2022
90+3 मिनिटाला बेन्नीने दुरून जबरदस्त आक्रमण केले अन् शॉट ऑन टार्गेट असलेला हा प्रयत्न मोहन बागानच्या गोलरक्षकाला हवेत झेप घेत अडवावा लागला. आत्मविश्वास उंचावलेल्या नॉर्थ ईस्टने आज त्यांची ताकद दाखवून दिली. 90+6 मिनिटाला मोहन बागानकडून बरोबरीचा गोल झालाच होता, परंतु मिर्शादने तो रोखला अन् नॉर्थ ईस्टने पहिला विजय मिळवला. या विजयानंतर नॉर्थ ईस्टच्या खेळाडूंच्या डोळ्यांत आनंदाश्रू दिसले.
निकाल : नॉर्थ ईस्ट युनायटेड 1 ( जॉर्डन विलमार 69 मि. ) विजयी वि. एटीके मोहन बागान 0.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष: ऍलिस्टर कूकच्या नावावर आहेत ‘हे’ खास 5 विक्रम
मुंबई सिटीच्या विजयाची ‘डबल’ हॅटट्रिक; चेन्नईयनला नमवून पुन्हा अव्वल स्थानी