गुवाहाटी | नॉर्थईस्ट युनायटेड एफसीची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) शुक्रवारी येथील इंदिरा गांधी अॅथलेटिक स्टेडियमवर बेंगळुरू एफसीविरुद्ध लढत होत आहे. बेंगळुरू एफसीसमोर गोलरक्षकाची समस्या आहे, पण त्यामुळे फायदा होणार नसल्याचा इशाराच नॉर्थईस्टचे जोओ डे डेयूस यांनी आपल्या संघाला दिला.
बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याला एफसी गोवाविरुद्ध लाल कार्ड दाखविण्यात आले. त्यामुळे त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी आली आहे. आभ्रा मोंडल याला दुखापत झाली आहे. लालथुआमाविया राल्टे संघात परतला असला तरी नवोदीत केल्वीन अभिषेक हा एकमेव तंदुरुस्त गोलरक्षक आहे.
नॉर्थईस्टचे प्रशिक्षक डेयूस म्हणाले की, बेंगळुरूकडे गोलरक्षक नसेल तरच केवळ फायदा होईल, पण तसे घडणार नाही. त्यांना गोलरक्षक मिळेल, पण मला याची फिकीर नाही, कारण मला माझ्या संघाकडे पाहिले पाहिजे. केल्वीन, राल्टे, गुरप्रीत किंवा दुसरा कुणीतरी असेल. तो निवडणे त्यांच्या प्रशिक्षकांचे काम आहे, माझे नव्हे. मी एक खात्रीने सांगू शकतो की टीपी रेहेनेश आमचा गोलरक्षक असेल आणि त्यांच्याकडे एक गोलरक्षक असेल.
बेंगळुरू एफसीचे प्रशिक्षक अल्बर्ट रोका यांनी पहिल्या पसंतीचा गोलरक्षक अद्याप निवडलेला नाही. राल्टेविषयी नक्की सांगता येणार नाही असे त्यांनी सुचित केल्यामुळे त्यांच्यासमोर केल्वीनवाचून पर्याय नसेल. ते म्हणाले की, बचावाच्या आघाडीवर काही समस्या आहेत, पण मी परिस्थिती बदलू शकत नाही. माझ्या गोलरक्षकांच्या क्षमतेविषयी आत्मविश्वास आहे. जो कुणी खेळेल तो आपली जबाबदारी चांगली पार पाडेल.
पाहुण्या संघासाठी शैलीदार स्ट्रायकर आणि कर्णधार सुनील छेत्री उपलब्ध असेल. हा भारतीय कर्णधार विवाहबद्ध झाल्यानंतर संघात सहभागी झाला आहे. तो लढतीसाठी तो सज्ज असल्याचे सांगताना रोका यांनी कौतुक केले. माझ्या कारकिर्दीत मी पाहिलेला तो सर्वांत आदर्श व्यावसायिक खेळाडू असल्याचे त्यांनी नमूद केले.
कमकुवत गोलरक्षण ही बेंगळुरूची समस्या आहे. याशिवाय गोव्याकडून हरल्यानंतर त्यांचे मनोधैर्य काहीसे खचले आहे. याचा फायदा उठविण्याची संधी नॉर्थईस्टला मिळाली आहे. नॉर्थईस्टने मागील सामन्यात दिल्ली डायनॅमोजवर महत्त्वाचा विजय संपादन केला. आता विजयांची संख्या वाढविण्याचा आत्मविश्वास त्यांना वाटत आहे.
डेयूस यांनी सांगितले की, 15 दिवसांपूर्वी आम्ही जमशेदपूरविरुद्ध खेळलो. तेव्हाच्या तुलनेत खेळ सुधारला आहे. या कालावधीत आम्ही आमचे स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी कसून सराव केला. आम्ही सरस खेळत आहोत आणि बेंगळुरूचा खेळ सुद्धा पहिल्या सामन्याच्या तुलनेत सुधारल्याची मला खात्री आहे.
नॉर्थईस्ट तीन सामन्यांतून चार गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे, तर बेंगळुरू तीन सामन्यांतून सहा गुण तसेच सरस गोलफरकामुळे आघाडीवर आहे.