गोवा (२७ डिसेंबर) : डेशॉर्न ब्राउनच्या हॅटट्रिकच्या जोरावर तळातील नॉर्थ ईस्ट युनायटेडने हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) साखळी सामन्यात सोमवारी गतविजेता मुंबई सिटी एफसीला ३-३ असे बरोबरीत रोखले. उभय संघांचा यंदाच्या हंगामातील हा पहिलाच ड्रॉ आहे.
मुंबई सिटी एफसीच्या गुणफरकांमध्ये दुपटीचा फरक असला तरी, नॉर्थ ईस्ट युनायटेडने दाखवलेली जिगर उल्लेखनीय ठरली. फातोर्डातील पीजीएन स्टेडियमवर ब्राउन हिरो ठरला. त्याने पूर्वार्धात एक आणि उत्तरार्धात दोन गोल केले. त्यामुळे नवव्या स्थानी असलेल्या नॉर्थ ईस्ट युनायटेडला हरवून अव्वल स्थान अधिक मजबूत करण्याचे मुंबईचे स्वप्न भंगले. इगोर अँग्युलोच्या दोन गोलांमुळे मध्यंतरापर्यंत गतविजेत्यांचे वर्चस्व राहिले तरी उत्तरार्धात डेशॉर्न ब्राउनला रोखण्यात त्यांना अपयश आले.
उत्तरार्धाच्या प्रारंभी इगोर अँग्युलो पुन्हा एकदा मुंबई सिटीच्या मदतीला धावून आला. यावेळी वायगॉर कॅटाटाउच्या सुरेख पासवर त्याने चेंडूला अचूक गोल जाळ्यात टाकताना आघाडी ३-१ अशी वाढवली. मात्र, अँग्युलोप्रमाणे नॉर्थ ईस्ट युनायटेडचा डेशॉर्न ब्राउनही भन्नाट फॉर्मात होता. मैदानाच्या मध्यावरून चेंडूचा ताबा घेत उजव्या बाजूने त्याने मुंबई सिटीच्या गोलपोस्टकडे कूच केली. गतविजेते आघाडी कायम राखणार, असे वाटत असतानाच ब्राउनने ८०व्या मिनिटाला वैयक्तिक तिसरा गोल करताना नॉर्थ ईस्ट युनायटेडला ३-३ अशी बरोबरी साधून देत प्रतिस्पर्ध्यांना विजयापासून रोखले.
पहिले सत्र मुंबई सिटीच्या नावे राहिले. इगोर अँग्युलोसह बिपीन सिंगच्या अप्रतिम गोलांच्या जोरावर गतविजेत्यांनी २-१ अशी आघाडी घेतली. प्रतिस्पर्धी नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीचा पहिला गोल डेशॉर्न ब्राउनने केला. पूर्वार्धातील तिन्ही गोल अवघ्या ११ मिनिटांच्या फरकाने झाले. ४-२-३-१ अशा फॉर्मेशनने खेळण्याचा मुंबई सिटीला सुरुवातीला फारसा फायदा झाला नाही. प्रारंभी प्रतिस्पर्ध्यांची आघाडी फळी अधिक आक्रमक दिसली. त्यामुळे मुंबईने बचावावर अधिक भर दिला. मध्यंतराला मुंबईकडे आघाडी राहिली तरी खाते उघडण्याचा मान प्रतिस्पर्धी संघाने मिळवला. इम्रान खानच्या पासवर ब्राउनने नॉर्थ ईस्ट युनायटेडला २९व्या मिनिटाला आघाडी मिळवून दिली. मात्र, त्यांचा आघाडीचा आनंद चार मिनिटे टिकला. बिपीन सिंगच्या पासवर अँग्युलोने ३३व्या मिनिटाला मुंबई सिटी एफसीला १-१ अशी बरोबरी साधून दिली. या जोडीने सात मिनिटांच्या फरकाने क्लबला आघाडीवर नेले. यावेळी अँग्युलोच्या पासवर बिपीन सिंगने गोल केला.
सोमवारची बरोबरी ही मुंबई सिटीची आठ सामन्यांतील पहिली बरोबरी ठरली. ८ सामन्यांत १६ गुणांसह त्यांचे अव्वल स्थान कायम असले तरी, केरळा ब्लास्टर्सविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतर नॉर्थ ईस्ट युनायटेडविरुद्धची बरोबरी त्यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीनेही प्रथमच ड्रॉ पाहिला. ९ सामन्यांतून ८ गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये ते नवव्या स्थानी आहेत.
निकाल : नॉर्थ ईस्ट युनायटेड ३(डेशॉर्न ब्राउन-२९, ५५, ८०व्या मिनिटाला) बरोबरी वि. मुंबई सिटी एफसी ३(इगोर अँग्युलो -३३,५२व्या मिनिटाला, बिपीन सिंग -४०व्या मिनिटाला).