भारतीय क्रिकेट संघाने 1932 ला इंग्लंड विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. या सामन्यानंतर 88 वर्षात भारतीय संघाने मोठी प्रगती केली. तसेच आत्तापर्यंत भारताकडून अनेक दिग्गज फलंदाज खेळले आहेत. यात सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, गुंडप्पा विश्वनाथ, राहुल द्रविड,सौरव गांगुली, विरेंद्र सेहवाग, विराट कोहली अशा अनेक फलंदाजांचा समावेश आहे. त्यांनी मोठमोठे विक्रमही केले आहेत.
मात्र कसोटी क्रिकेटमध्ये असा एक विक्रम आहे जो असू एकाही भारतीय फलंदाजाला गेल्या 88 वर्षात करता आलेला नाही. तो विक्रम म्हणजे इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यातील दोन्ही डावात कोणत्याच भारतीय क्रिकेटपटूला शतक करता आलेले नाही.
इंग्लंड विरुद्ध आत्तापर्यंत जगभरातील 14 फलंदाजांनी 15 वेळा कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके करण्याचा कारनामा केला आहे. यात ऑस्ट्रेलियाच्या 5 फलंदाजांचा, वेस्ट इंडिजच्या 3 फलंदाजाचा, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि पाकिस्तानच्या प्रत्येकी 2 फलंदाजांचा समावेश आहे. तसेच वेस्ट इंडिजचे जॉर्ज हॅडली यांनी इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक करण्याचा पराक्रम 2 वेळा केला आहे. त्यांनी 1930 मध्ये आणि 1939 मध्ये असा कारनामा केला होता.
इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतकी खेळी करण्याच्या जवळपास आत्तापर्यंत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली पोहचले होते. मात्र त्यांना थोडक्यात या विक्रमाने हुलकावणी दिली. गंभीरने 2008 मध्ये मोहालीत झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 179 धावा केल्या होत्या.
तर दुसऱ्या डावात 97 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात त्याचे शतक केवळ 3 धावांनी हुकले होते. त्यानंतर 2018 मध्ये इंग्लंड दौऱ्यात विराटने ट्रेंटब्रिज कसोटीमध्ये पहिल्या डावात 97 धावा केल्या होत्या. यावेळी त्याला आदिल राशिदने बाद केले होते. त्यावेळी त्याचेही शतक केवळ 3 धावांनी हुकले होते. तर दुसऱ्या डावात त्याने 103 धावांची खेळी केली होती. दुसऱ्या डावात विराट ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर बाद झाला होता.
भारताकडून 6 फलंदाजांनी केला कसोटीच्या दोन्ही डावात शतके करण्याचा कारनामा –
आत्तापर्यंत 88 वर्षांत भारत्याच्या 6 फलंदाजांनी मिळून 9 वेळा कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके करण्याचा कारनामा केला आहे. यात भारताची माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी आत्तापर्यंत ३ वेळा कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतके करण्याचा पराक्रम केला आहे. त्यांनी सर्वात आधी १९७१ ला वेस्ट इंडिज दौऱ्यात पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळल्या गेल्या कसोटी सामन्यात असा पराक्रम केला होता.
त्यांनी दुसऱ्यांदा १९७८ मध्ये पाकिस्तान विरुद्ध कराची येथे १४-१९ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या कसोटी सामन्यात असा पराक्रम केला होता. तर तिसऱ्यांदा त्यांनी असा कारनामा १९७८-७९ च्या मोसमात कोलकाता येथे वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात केला होता. त्यांच्यानंतर दोन वेळा असा कारनामा राहुल द्रविडने केला आहे. द्रविडने पहिल्यांदा २-६ जानेवारी १९९९ ला हॅमिल्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतके केली होती. त्यानंतर असा पराक्रम त्याने २००५ ला पाकिस्तान विरुद्ध कोलकाता येथे खेळताना दुसऱ्यांदा केला.
गावस्कर आणि द्रविड व्यतिरिक्त विजय हजारे, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांनी प्रत्येकी 1 वेळा कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतकी खेळी करण्याचा कारनामा केला आहे. सर्वात आधी भारताकडून विजय हजारे यांनी कसोटीच्या दोन्ही डावात शतकी खेळी करण्याचा कारनामा केला होता. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडलेड येथे २३ ते २८ जानेवारी १९४८ दरम्यान झालेल्या कसोटी सामन्यात हा पराक्रम केला होता केला होता.