२०२६ च्या आयसीसी टी-२० विश्वचषकात पाकिस्तानच्या संघाची कामगिरी आतापर्यंत साधारण राहिली आहे. यामुळेच या संघाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार कोणीही मानत नाहीये. मात्र, सध्या सोशल मीडियावर एका विशेष योगायोगाची (Combination) चर्चा सुरू असून, त्यामुळे पाकिस्तानचा संघ ट्रॉफी उंचावू शकतो असा दावा चाहते करत आहेत. हे समजल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे, विशेषतः भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे चाहते हा योगायोग पाहून थक्क झाले आहेत.
पाकिस्तानच्या संघाने आतापर्यंत तीन वेळा आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे आणि या तिन्ही प्रसंगी ऑस्ट्रेलियाचा संघ लीग स्टेजमधूनच बाहेर पडला होता. पहिला प्रसंग १९९२ मध्ये घडला होता, जेव्हा वनडे वर्ल्ड कपमध्ये इमरान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने पहिल्यांदा विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर २००९ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्येही ऑस्ट्रेलियाचा संघ लीग स्टेजमधून बाहेर पडला होता; त्यावेळी युनिस खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने जेतेपदावर नाव कोरले होते. याशिवाय, २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही ऑस्ट्रेलियाचा संघ लीग स्टेजमधूनच बाहेर झाला होता आणि तेव्हाही सरफराज खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने ट्रॉफी उचलली होती. विशेष म्हणजे, या वेळीही ऑस्ट्रेलियाचा संघ लीग स्टेजमधून बाहेर पडला आहे, तर पाकिस्तानचा संघ सुपर-८ मध्ये पोहोचला आहे.
आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या सुपर-८ मध्ये पाकिस्तानचा संघ आपला पहिला सामना २१ फेब्रुवारीला न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर २४ फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना होईल, तर तिसरा सामना २८ फेब्रुवारीला श्रीलंकेविरुद्ध असेल. जर पाकिस्तानने या ३ पैकी २ सामन्यांत मोठ्या फरकाने विजय मिळवला, तर त्यांच्यासाठी उपांत्य फेरीचा (Semi-final) मार्ग सोपा होईल. पाकिस्तानचा संघ सध्या श्रीलंकेतच आपले सर्व सामने खेळत आहे.






