रविवारी (8 मार्च) मेलबर्न येथे पार पडलेल्या आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने 85 धावांनी भारताला पराभूत केले. तसेच 5व्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. या सामन्यानंतर भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज शिखा पांडेने भारतीय महिला संघ अंतिम सामन्यात सर्व क्षेत्रात चांगली कामगिकी करण्यात कमी पडला, याचा स्विकार केला आहे.
यावेळी पांडे म्हणाली की, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने केवळ क्षेत्ररक्षणातच नव्हे तर, क्रिकेटच्या प्रत्येक विभागात (म्हणजेच फलंदाजी आणि गोलंदाजी) भारतापेक्षा चांगली कामगिरी केली.
आयसीसीच्या वेबसाइटनुसार पांडेने लिहिले आहे की, ‘आम्ही अंतिम सामन्यावेळी नर्वस नव्हतो. एकदा मैदानावर उतरल्यानंतर सर्व काही ठीक वाटते. मात्र, ऑस्ट्रेलियाची सलामीची फलंदाज बेथ मूनी (Beth Mooney) (नाबाद 78) आणि यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हेलीचा (Alyssa Healy) (75 धावा) झेल सोडणे भारताला महागात पडले.’
मूनीला भारताची गोलंदाज राजेश्वरी गायकवाड तर हेलीला भारताची युवा फलंदाज शेफाली वर्माने झेल सोडत जीवनदान दिले. यावर पांडे म्हणाली, “जर फलंदाजांना अशा संधी दिल्या गेल्या तर ते दबाव निर्माण करणारच. शेवटी आम्हाला याचे फळ भोगावेच लागले. आम्ही तिन्ही विभागात चांगले प्रदर्शन करायला हवे होते. तरी, आम्ही या टी20 विश्वचषकाचा भाग होतो ही खूप भाग्याची गोष्ट आहे. पण, अंतिम सामन्यात पराभूत होणे खूप निराशाजनक ठरले.”
“असे असले तरी, आम्हाला महान टेनिस क्रिकेटपटू बिली जे किंगला (Billie Jean King) भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी महिला खेळांसाठी खूप मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी आम्हाला अजून जास्त मेहनत घेण्याचा सल्ला दिला. एवढेच नव्हे तर, आमचे दुर्देव होते की आम्ही हे विश्वचषक पराभूत झालोत, असेही त्या आम्हाला म्हणाल्या.”






