आघाडीचा टेनिसपटू सार्बियाचा नोव्हाक जोकोविचने वर्षातील चौथी ग्रँडस्लॅम असलेल्या अमेरिकन ओपनमधून माघार घेतली आहे. कोविडची लस न टोचल्यास अमेरिकेत येण्यास इतर देशातील नागरिकांना बंदी आहे. जोकोविचने सुरुवातीपासूनच कोविड लस टोचून घेण्यास नकार दिला होता. मागील वर्षी याच कारणाने तो ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी झाला नव्हता.
A statement from the US Open: pic.twitter.com/E5ijwpkKjS
— US Open Tennis (@usopen) August 25, 2022
जोकोविच हा २१ वेळा ग्रँडस्लॅम जिंकणारा टेनिसपटू आहे. त्याच्यापेक्षा अधिक ग्रॅंडस्लॅम केवळ स्पेनच्या राफेल नदालने जिंकले आहेत. स्वतः जोकोविचने २०११, २०१५ व २०१८ मध्ये अमेरिकन ओपनचे विजेतेपद पटकावले होते.
अमेरिकन ओपनच्या आयोजकांनी एक पत्रक काढून याबाबत माहिती देताना म्हटले,
“नोवाक एक महान खेळाडू आहे. मात्र, दुर्दैवीरित्या तो यावर्षी अमेरिकन ओपनमध्ये सहभागी होणार नाही. विदेशी नागरिकांसाठी सरकारच्या असलेल्या कोविड लसीकरणाच्या नियमांमुळे तो स्पर्धेत सहभाग घेत नाही. पुढील वर्षी आपण त्याचे स्वागत करण्यासाठी तयार असू.”
स्वतः जोकोविचने ट्विट करत लिहिले,
“दुर्दैवाने मी यावर्षी अमेरिकन ओपनमध्ये सहभाग घेण्यासाठी न्यूयॉर्कला जात नाही. मला पाठिंबा देणाऱ्या माझ्या चाहत्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. या मानाच्या स्पर्धेत खेळणाऱ्या माझ्या इतर सहकारी मित्रांना यश चिंतितो. लवकरच भेटूया.”
जोकोविचने जुलै महिन्यात झालेल्या विम्बल्डन ओपनमध्ये विजेतेपद पटकावले होते. जोकोविचचे प्रमुख प्रतिस्पर्धी असलेले राफेल नदाल व रॉजर फेडरर हे मात्र अमेरिकन ओपनमध्ये खेळणार आहेत.