भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी T20 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघाची घोषणा केली. ऑक्टोबरमध्ये कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वचषकात उतरेल. या संघात काही अनपेक्षित नावांचा समावेश होईल अशी अनेकांना अपेक्षा होती. अनुभवी सलामीवीर शिखर धवन याचा या संघात समावेश न झाल्याने त्याचे चाहते निराश झाले. आता केवळ बदली कर्णधार म्हणूनच शिखर भारतीय संघात दिसणार का? असा प्रश्नही काही चाहते विचारू लागले आहे.
शिखरने मागील दीड वर्षात भारतीय संघासाठी जे सामने खेळले आहेत, त्यामध्ये तो कर्णधार अथवा उपकर्णधार होता. प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिल्यानंतर त्याच्याकडे थेट कर्णधारपद येत आहे. त्यामुळे रोहित आणि राहुल उपलब्ध नसल्यास राखीव कर्णधार म्हणून त्याचा संघात समावेश होतोय. टी20 विश्वचषकाआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेतही तोच संघाचे नेतृत्व करण्याची दाट शक्यता आहे.
शिखर धवन याच्यासाठी टी20 संघात पुनरागमन करणे अवघड झाल्याचे बोलले जातेय. विश्वचषकातही रोहित व राहुल हेच सलामीवीर असतील. भविष्याचा विचार केल्यास ईशान किशन, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड आणि पृथ्वी शॉ यांच्यासारखे सक्षम व युवा पर्याय भारतीय संघाकडे आहेत. त्यामुळे 35 शी गाठलेला शिखर कमीत कमी टी20 संघात तरी आता दिसणे काहीसे कठीण आहे. याची दुसरी बाजू म्हणजे तो वनडे संघात पुढील दोन वर्ष तरी खेळण्याची शक्यता आहे. या सर्व प्रक्रियेदरम्यान त्याचा फॉर्म कसा आहे यावर बरेचसे गणित अवलंबून असेल.
धवनने गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या प्रसंगी भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. गेल्या वर्षी श्रीलंका दौऱ्यात तो वनडे आणि टी20 संघांचा कर्णधार होता. त्यानंतर जुलैमध्ये त्याने वेस्ट इंडिज दौऱ्यावर वनडे मालिकेत नेतृत्व सांभाळलेले. ऑगस्टमध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावरही त्याला कर्णधार बनवण्यात आले होते. मात्र, केएल राहुलचा संघात समावेश केल्यानंतर धवनला संघाचे नेतृत्व सोडावे लागले.