भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात सध्या 3 सामन्यांची टी20 मालिका(T20I Series) सुरु आहे. या मालिकेत भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीचा(MS Dhoni) समावेश करण्यात आलेला नाही. धोनी मागील काही महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे.
त्याने भारताकडून शेवटचा सामना 2019 विश्वचषकात जूलैमध्ये उपांत्यफेरीत न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. त्यानंतर धोनी वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि आता बांगलादेश विरुद्धच्या टी20 सामन्यांना मुकला आहे.
विशेष म्हणजे भारताने आत्तापर्यंत खेळलेल्या टी20 सामन्यांपैकी धोनी त्याच्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या 11 वर्षात जितक्या सामन्यांना मुकला त्यापेक्षा जवळ जवळ तीन पटीने अधिक टी20 सामन्यांना तो गेल्या 2 वर्षात मुकला आहे.
धोनीला 2006 ते 2017 पर्यंत भारताचे एकूण केवळ 5 सामने मुकावे लागले होते. तर 2018 ते आत्तापर्यंत( बांगलादेश विरुद्धचे टी20 मालिकेतील 3 सामने मिळून) तो भारताच्या 20 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांना(T20I) मुकला आहे.
धोनीने त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा टी20 सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध 27 फेब्रुवारी 2019 ला खेळला आहे. या सामन्यात त्याने 40 धावा केल्या होत्या.
विशेष म्हणजे धोनी 1 डिसेंबर 2006 ला झालेल्या भारताच्या पहिल्या टी20 सामन्यातही खेळला होता. तेव्हापासून भारताने कालपर्यंत (रविवार,3 नोव्हेंबर) एकूण 121 टी20 सामने खेळले.
तसेच भारतीय संघ 7 आणि 10 नोव्हेंबरला बांगलादेश विरुद्ध खेळणाऱ्या टी20 सामन्यातही धोनीचा समावेश असणार नाही. त्यामुळे नोव्हेंबर 2019 पर्यंत धोनी एकूण भारताच्या 25 टी20 सामन्यांना मुकेल.
धोनीने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत एकूण 98 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 37.60 च्या सरासरीने 1617 धावा केल्या आहेत.