वेलिंगटन। भारताला आज (6 फेब्रुवारी) वेस्टपॅक स्टेडियमवर झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात 80 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. यामुळे भारत 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 0-1 असे मागे पडले आहेत.
आतापर्यंत भारताने न्यूझीलंडमध्ये 3 टी20 सामने खेळले आहेत. या तीन्ही सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला आहे.
2009च्या न्यूझीलंड दौऱ्यात भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली वन-डे मालिका जिंकली होती. मात्र 2 सामन्यांची टी20 मालिका गमावली होती.
त्याचबरोबर भारताने न्यूझीलंड विरुद्ध 9 टी20 सामन्यात खेळताना 7 सामने गमावले आहेत.
आजच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा भारताला चांगलाच फटका बसला.
न्यूझीलंडचा यष्टीरक्षक टीम सेफर्टने भारतीय गोलंदाजांना धूत 43 चेंडूत 84 धावा केल्या. त्याला खलील अहमदने रोखले. मात्र तोपर्यंत न्यूझीलंडने भक्कम धावसंख्या उभारली होती.
न्यूझीलंडने 6 विकेट्स गमावत 219 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने कर्णधार रोहित शर्माची पहिली विकेट लवकरच गमावली. यावेळी भारताकडून धोनीने सर्वाधिक 39 धावा केल्या. तर शिखर धवन (29), विजय शंकर (27) आणि कुणाल पंड्या (20) यांनाच दोन अंकी धावा करण्यात यश आले.
गोलंदाजीमध्ये भारताकडून हार्दिक पंड्याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. मात्र यासाठी त्याने 51 धावा मोजल्या. त्याच्याबरोबर भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, युजवेंद्र चहल आणि कृणाल पंड्या यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
–जी वेळ रोहित शर्माच्या टीम इंडियावर आली ती कधीही विराटच्या संघावर आली नव्हती
–कसोटी, वनडेपाठोपाठ धोनीचा टी२०मध्येही एक खास विक्रम
–या दिग्गज भारतीय महिला क्रिकेटपटूचा टी२० क्रिकेटला अलविदा ?