तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे पूर्ण न खेळवता रद्द करण्यात आला. या सामन्यानंतर भारतीय संघाचा युवा खेळाडू शुबमन गिल याने महत्त्वाचे विधान केले. त्याच्या या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. चला तर जाणून घेऊया गिल काय म्हणाला आहे.
गिलचे वक्तव्य
न्यूझीलंड विरुद्ध भारत संघातील सामना जेव्हा पावसामुळे रद्द करण्यात आला, तेव्हा भारतीय संघाने 12.5 षटकात 1 विकेट गमावत 89 धावा केल्या होत्या. यामध्ये शुबमन गिल (Shubman Gill) याने 42 चेंडूत नाबाद 45, आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) 25 चेंडूत नाबाद 34 धावांचे योगदान देत खेळपट्टीवर खेळत होते. हा सामना रद्द झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना गिल म्हणाला की, “मी यावेळी विश्वचषक 2023वर लक्ष देत नाहीये. यावेळी माझे लक्ष ज्या संधी मिळाल्यात, त्यामध्ये मोठी खेळी करण्यावर आहे. या मालिकेतही माझा हाच प्रयत्न असणार आहे.”
शुबमन गिल याने यावर्षी 11 वनडे सामन्यात 78.12च्या सरासरीने 625 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 4 अर्धशतकांचाही समावेश आहे. यादरम्यान 130 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याने मान्य केले आहे की, पावसामुळे निराशा झाली आहे आणि योजना आखण्यातही समस्या निर्माण झाल्या आहेत.
पुढे बोलताना तो म्हणाला की, सध्या शानदार फॉर्मात असलेल्या सूर्यकुमारसोबत फलंदाजी करताना त्याला मजा आली. तो म्हणाला, “मैदानावर सूर्याकडून काहीच चर्चा करण्याची गरज नाहीये. कारण, तो खूप चांगला खेळत आहे.”
वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजीत आक्रमक विचार करत 400 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणे अपेक्षित आहे. यावर गिल म्हणाला की, सातत्याने 400 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणे सोपे नाहीये. “प्रत्येक वर्षी दोन किंवा तीन वेळा 400-450 धावा केल्या जाऊ शकतात. जेव्हा तुम्ही 300-350 धावा करता, तेव्हा सामना चांगला होतो. हे सर्व परिस्थितीवर अवलंबून आहे. मग तुम्ही पहिल्यांदा फलंदाजी करा किंवा दुसऱ्यांदा.”
खरं तर, न्यूझीलंड संघाने रविवारी (दि. 27 नोव्हेंबर) दुसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. 4.5 षटकात भारताने एकही विकेट न गमावता 22 धावा केल्या होत्या. यावेळी पहिल्यांदा पाऊस पडला होता. यानंतर सामना प्रत्येकी 29 षटकांचा करण्यात आला होता. सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर भारताचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) याची विकेट पडली होती. धवन बाद झाल्यानंतर गिल आणि सूर्यकुमार यांनी दुसऱ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी रचली होती. मात्र, पुन्हा पाऊस पडल्याने सामना होऊ शकला नाही.
मालिकेतील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना ख्राईस्टचर्च येथे खेळला जाणार आहे. हा सामना बुधवारी (दि. 30 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. सध्या न्यूझीलंड संघ मालिकेत 1-0ने आघाडीवर आहे. (nz vs ind younger cricketer shubman gill says focus making chances get)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ 2 कारणांमुळे संजू सॅमसन सारखाच होतोय टीम इंडियातून बाहेर? वसीम जाफरचा संघ व्यवस्थापनावर निशाणा
पाणी काढण्यासाठी सूर्या स्वतः उतरला मैदानात, व्हिडिओ होतोय व्हायरल