पाकिस्तान संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. शनिवारपासून (२६ डिसेंबर) बे ओव्हल स्टेडियमवरील ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याने न्यूझीलंड-पाकिस्तान संघातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात झाली आहे. या पाच दिवसीय कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात ३ बाद २२२ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आणि हेन्री निकोल्स नाबाद खेळत आहेत.
पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि न्यूझीलंडला सुरुवातीला फलंदाजीचे आमंत्रण दिले. पण न्यूझीलंडचे सलामीवीर फलंदाज टॉम लॅथम आणि टॉम ब्लंडेल दोन आकडी धावादेखील करू शकले नाहीत. पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन आफ्रिदीने त्यांना बाद केले.
त्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार विलियम्सन आणि अनुभवी खेळाडू रॉस टेलर यांनी मिळून १२० धावांची भागिदारी साकारली. परंतु पाकिस्तानचा गोलंदाज आफ्रिदीने ५६.५ षटकात टेलरला कर्णधार मोहम्मद रिझवानच्या हातून झेलबाद केले आणि त्यांची भागिदारी मोडली. टेलरने ७० धावांची खेळी केली. १० चौकार आणि १ षटकार लगावत त्याने ही धावसंख्या गाठली होती.
शेवटी विलियम्सन आणि हेन्री निकोल्सने मिळून संघाचा डाव सावरला. पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त होईपर्यंत विलियम्सनने नाबाद ९४ धावा केल्या. दरम्यान त्याने ८ चौकार आणि १ षटकारही ठोकला. तसेच निकोल्सनेही ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ४२ धावा करत संघाचा डाव २२२ धावांपर्यंत पोहोचवला.
पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना आफ्रिदीने ५५ धावांवर ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त इतर एकाही गोलंदाजाला विकेट घेण्यात यश आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS Live : भारताच्या दमदार गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांवर आटोपला
‘बॉक्सिंग डे’ कसोटी: भल्याभल्या दिग्गजांना न जमलेल्या विक्रमाची रॉस टेलरच्या नावे नोंद, ठरला पहिलाच