वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 32वा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघ आमने-सामने होते. हा सामना रंगतदार पद्धतीने पार पडला. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात चौकार-षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. मात्र, दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी निराश केले, पण दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज चमकले. हा सामना दक्षिण आफ्रिकेने 190 धावांनी जिंकला. अशात एवढ्या मोठ्या फरकाने पराभूत झाल्यानंतर कर्णधार टॉम लॅथम याने निराशा व्यक्त केली.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात फक्त 4 विकेट्स गमावत 357 धावांचा भलामोठा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आले. त्यांचा संपूर्ण डाव अवघ्या 35.3 षटकात 167 धावांवर संपुष्टात आला. हा त्यांचा स्पर्धेतील तिसरा पराभव ठरला.
काय म्हणाला लॅथम?
लाजीरवाण्या पराभवानंतर न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम (Tom Latham) निराश झाला. तो म्हणाला की, हे संघाचे सर्वोत्तम प्रदर्शन नाहीये. क्विंटन डी कॉक आणि रासी व्हॅन डर ड्युसेनमध्ये चांगली भागीदारी झाली. हेच आम्हाला महागात पडले. तो असेही म्हणाला की, खेळाडूंची दुखापत चिंताजनक आहे.
संघाच्या प्रदर्शनावर लॅथम म्हणाला की, “हे आमचे सर्वोत्तम प्रदर्शन नाहीये. क्विंटन डी कॉक आणि रासी व्हॅन डर ड्युसेन यांच्या शानदार भागीदारीने आमच्यावर दबाव बनवला. नंतर लवकर 5 विकेट्स पडणे आमच्यासाठी निराशाजनक होते. ही एक चांगली खेळपट्टी होती, जर आम्ही त्यांना 330-340 धावांपर्यंत रोखले असते, तर चांगले झाले असते. आम्ही फलंदाजीतही खेळपट्टीचा फायदा उचलू शकलो नाहीत. आमच्यासाठी खेळाडूंच्या दुखापती चिंताजनक आहेत.”
सामन्याचा आढावा
दक्षिण आफ्रिकेकडून 357 धावांचा डोंगर उभारताना क्विंटन डी कॉक आणि रासी व्हॅन डर ड्युसेन यांनी शतक ठोकले. डी कॉकने 116 चेंडूत 114 धावा, तर रासीने 118 चेंडूत 133 धावांची शतकी खेळी केली. त्यांच्याव्यतिरिक्त डेविड मिलर यानेही 30 चेंडूत 53 धावांचे योगदान दिले. यावेळी न्यूझीलंडच्या तीन गोलंदाजांना विकेट मिळाली. त्यात टीम साऊदीला 2, तर ट्रेंट बोल्ट आणि जिमी नीशम यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडकडून फक्त ग्लेन फिलिप्स चमकला. त्याने 50 चेंडूत 60 धावांचे योगदान दिले. तसेच, विल यंगने 30, तर डॅरिल मिचेलने 24 धावा केल्या. याव्यतिरिक्त एकही फलंदाज 10 धावांचा आकडा पार करू शकला नाही. यावेळी दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना केशव महाराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसचे, मार्को यान्सेनने 3, तर जेराल्ड कोएट्जीने 2 आणि कागिसो रबाडाने 1 विकेट घेतली. (nz vs sa world cup 2023 skipper tom latham statement after lose match against south africa)
हेही वाचा-
ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के! ‘या’ विस्फोटक खेळाडूने सोडला भारत, ऑस्ट्रेलियाला रात्रीच रवाना, पण का?
न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारताच टेम्बा बावुमाची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘उशीरपर्यंत टिकल्यामुळे…’