सन १९८७ च्या ऑक्टोबरमध्ये भारतीय उपखंडात अत्यंत उत्साहाचे आणि ऊर्जेने वातावरण तयार झाले होते. कारण, इंग्लंडच्या बाहेर प्रथमच विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले. पाकिस्तानमधील हैदराबाद येथे झालेल्या स्पर्धेच्या उद्घाटनाचा पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना पाहण्यासाठी हजारो लोकांची झुंबड उडाली होती. कमालीचा रोमांचक ठरलेला पहिलाच सामना अवघ्या १५ धावांनी जिंकत यजमान पाकिस्तानने विजयी सलामी दिली होती.
एकदिवसीय क्रिकेटची वाढती लोकप्रियता आणि सलामीच्या सामन्यातील थरार यामुळे इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसर्या सामन्यासाठी गुजरानवाला येथील म्युनिसिपल स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. त्यावेळी खेळल्या गेलेल्या सर्वोत्तम एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी हा एक सामना असेल याची कल्पना कोणीही केली नव्हती.
तेव्हाचा क्रिकेटमधील दादा संघ आणि साहेबांचा संघ यांच्यात सुरू झाला सामना…
भारतीय उपखंडातील खेळपट्ट्यांचा अभ्यास करून, बहुतेक संघांनी सर्व प्रकारच्या फिरकीपटूंना संघात निवडले होते. इंग्लंडने मात्र, फिल डेफ्रीटास, नील फॉस्टर, ग्लेडस्टोन स्मॉल आणि डेरेक प्रिंगल या चार वेगवान आणि मध्यम-वेगवान गोलंदाजांना प्राधान्य दिले होते. जॉन एम्ब्र्यूच्या रूपाने फक्त एक ऑफस्पिनर इंग्लंडच्या संघात होता.
कार्लिले बेस्ट आणि डेसमन्ड हेन्स लवकर बाद झाले, तरीही विव्ह रिचर्ड्स आणि रिची रिचर्डसन यांनी वेस्ट इंडिजचा डाव सावरला. रिचर्डसन यांनी दमदार अर्धशतक झळकावले. मात्र, इंग्लंडचे वेगवान गोलंदाज नील फॉस्टर यांनी पलटवार करत दोन्ही फलंदाजांना त्रिफळाचीत केले.
..अन् वेस्टइंडीजच्या फलंदाजांनी शेवटच्या दहा षटकात ९२ धावा चोपत संघाला सावरले
दोन्ही फलंदाज बाद झाल्यावर ऑफस्पिनर एम्ब्र्यू यांना गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले. त्यांनी आपल्या फिरकीने वेस्ट इंडिजचा डाव असा काही आवळला की, इच्छा असूनही वेस्टइंडीजच्या आक्रमक फलंदाजांना मोठे फटके मारता येत नव्हते. एम्ब्र्यू यांनी आपल्या दहा षटकांच्या गोलंदाजीत अवघ्या २२ धावा दिल्या. त्यांना बळी मिळवण्यात अपयश आले तरीही, त्यांनी वेस्टइंडीजच्या डावाला लगाम घालण्याचे काम चोख पार पाडले.
गस लोगी आणि जेफ्री दुजा या जोडीने एम्ब्र्यू यांची षटके खेळून काढल्यानंतर वेगवान गोलंदाजांना लक्ष करण्यास सुरुवात केली. दुजा दुर्देवीरीत्या धावबाद झाल्यानंतर, रॉजर हार्पर यांनी डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. प्रिंगल यांच्या एका षटकात त्यांनी २२ धावा वसूल केल्या. लोगी यांच्या ४१ चेंडूतील आक्रमक ४९ धावा व हार्पर यांच्या १० चेंडूतील २४ धावांनी सामन्याचा नूर पालटला. चाळीस षटकात १५१-४ असणारी धावसंख्या पन्नास षटकांच्या अखेरीस २४३-७ अशी दिसत होती. ३३ वर्षांपूर्वी वेस्टइंडीजच्या फलंदाजांनी शेवटच्या दहा षटकात ९२ धावा चोपल्या होत्या.
पत्त्याचा बंगला कोसळावा तसे इंग्लंडचे काही फलंदाज नांग्या टाकत होते, परंतू…
२४४ चे लक्ष्य इंग्लंडसाठी अजिबात सोपे नव्हते. इयान बोथम यांच्या अनुपस्थितीत त्यांची फलंदाजी काहीशी कमकुवत भासत होती. त्यात भर म्हणून, पॅट्रिक पॅटरसन, कर्टनी वॉल्श आणि विन्स्टन बेंजामिन यांच्या वेगवान गोलंदाजीचा सामना त्यांना करावा लागणार होता. रॉजर हार्पर आणि कार्ल हूपरसारखे विश्वासू फिरकीपटू देखील वेस्ट इंडीजकडे होते. इंग्लंडच्या डावाची सुरुवात अतिशय खराब झाली. ख्रिस ब्रॉड यांनी वॉल्श यांच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक दुजा यांच्याकडे झेल दिला तर टीम रॉबिनसन विचित्ररित्या धावबाद झाले. त्यानंतर माइक गेटिंग आणि ग्रॅहम गूच यांनी नऊ षटकांत ५८ धावांची भागीदारी रचली. हूपर यांनी गेटिंग व गूच यांना बाद केल्यानंतर, वेस्ट इंडीजचे पारडे जड झाले.
‘ऍलन लॅम्ब’ हाच काय तो आता इंग्लंडचा एकमेव आधार उरला होता…
प्रमुख फलंदाज बाद होत असताना ऍलन लॅम्ब यांनी धीराने फलंदाजी सुरू ठेवली. प्रिंगल यांच्यासमवेत त्यांनी छोटीशी भागीदारी रचली. हूपर यांनी प्रिंगल यांना बाद करत आपला तिसरा बळी मिळवला. प्रिंगल बाद झाले तेव्हा इंग्लंडची धावसंख्या १२३-५ अशी झाली होती. नवीन फलंदाज पॉल डॉटन खातेही न खोलता माघारी परतले.
लॅम्ब यांच्या साथीला आलेल्या एम्ब्र्यू यांनी इंग्लंडला, गरजेच्या अशा झटपट २२ धावा काढून दिल्या. एम्ब्र्यू बाद झाले तेव्हा, इंग्लंडला विजयासाठी ९ षटकात ८२ धावांची गरज होती आणि त्यांचे तीन गडी शिल्लक होते. लॅम्ब वेस्ट इंडीजच्या घातक गोलंदाजांचा सामना करत असताना, सुदैवाने तळाचे फलंदाज त्यांना योग्य साथ देत होते. यावेळी, डेफ्रीटास हे लॅम्ब यांच्या मदतीला धावून आले.
लॅम्ब व डेफ्रीटास या जोडीने आठव्या विकेटसाठी ४७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यात डेफ्रीटास यांनी महत्त्वपूर्ण २३ धावांचे महत्वाचे योगदान दिले. पॅटरसन यांनी डेफ्रीटास यांना बाद केले तेव्हा इंग्लंडला विजयासाठी तीन षटकात ३५ धावांची गरज होती व इंग्लंडच्या सर्व आशा लॅम्ब यांच्यावर टिकून होत्या.
वेस्ट इंडिजच्या वॉल्शला चोपत अॅलन यांनी घडवला इतिहास….
वॉल्श यांचे ४८ वे षटक सामन्याला कलाटणी देणारे ठरले. त्या षटकात सोळा धावा लुटल्या गेल्या. त्यापैकी १५ धावा लॅम्ब यांनी काढल्या. ४९ व्या महत्त्वपूर्ण षटकात पॅट्रिक पॅटरसन यांनी अवघ्या सहा धावा देत सामना पुन्हा वेस्ट इंडिजच्या बाजूने झुकवला. आधीच्या षटकात १६ धावा दिलेले वॉल्श यावेळीही दडपणाखाली दिसले. त्यांनी चार वाईड व एक नोबॉल टाकत एक प्रकारे इंग्लंडला मदत केले. वॉल्श यांनी टाकलेला फुलटॉस चेंडू सीमारेषेपार पाठवताना फॉस्टर यांनी विजयी फटका खेळला. ॲलन लॅम्ब यांनी पाच चौकार व एका षटकारासह केलेली ६८ चेंडूतील ६७ धावांची अविस्मरणीय खेळी इंग्लंडच्या विजयासाठी कारणीभूत ठरली.
दुसरीकडे, हताश झालेल्या वॉल्श यांना कर्णधार रिचर्ड्स व संपूर्ण संघाने आलिंगन देत समजावण्याचा प्रयत्न केला. गुजरानवालाच्या मैदानावर आलेल्या २०,००० प्रेक्षकांचे मात्र पैसे पूर्णतः वसूल झाले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! 61 चेंडूत नाबाद 118 धावा करणारा फलंदाज टी20 वर्ल्डकपमधून बाहेर, ऑस्ट्रेलियाला झटका
सचिनची विकेट गेल्यावर सेहवाग अंपायर शेजारी जाऊन बसला, असे काय घडले होते बेंगलोर कसोटीत?