कॅरेबियन प्रीमियर लीग २०२१ च्या उपांत्य सामन्यात सेंट किट्स आणि नेविस पॅट्रियट्स अँड गयाना ऍमेझॉन वॉरियर्स यांच्यातील सामन्यादरम्यान एक विचित्र घटना घडली. प्रथम फलंदाजी करताना गयानाने सेंट किट्ससमोर विजयासाठी १७९ धावांचे लक्ष्य ठेवले. सेंट किट्सकडून सलामी देण्यासाठी ख्रिस गेल आणि एविन लुईस मैदानात उतरले. सामन्याच्या चौथ्या षटकात गयानाचा वेगवान गोलंदाज ओडियन स्मिथने गेलची बॅट मोडली. मात्र, युनिव्हर्सल बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गेलने त्याच षटकात त्याचा बदला घेतला.
लक्ष्याचा पाठलाग करताना गेल आणि लुईस जोडीने पहिल्या तीन षटकांत फक्त १९ धावा केल्या होत्या. स्मिथ चौथं षटक टाकण्यासाठी आला. स्मिथने षटकाची सुरुवात वाइड बॉलने केली. यानंतर गेलने पहिल्या चेंडूवर चौकार लगावला. स्मिथने याचा बदला घेतला आणि दुसरा चेंडू वेगात टाकत गेलची बॅट तोडली.
बॅट तुटताच गेलच्या फलंदाजीचा रंगही बदलला आणि त्याने स्मिथची गोलंदाजी अक्षरशः फोडून काढली. चौथ्या षटकाच्या शेवटच्या चार चेंडूंवर गेलच्या बॅटमधून १८ धावा आल्या. त्याने लागोपाठ दोन चौकार, एक षटकार आणि चौकार लगावत स्मिथच्या गोलंदाजीची हवा काढली.
https://twitter.com/CPL/status/1437901450974150658
गेल आणि लुईसच्या यांच्या फलंदाजीच्या जोरावर पॅट्रियट्सने गयानाने ऍमेझॉन वॉरियर्सचा सात गडी राखून पराभव केला. पॅट्रियट्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वॉरियर्ससाठी शिमरॉन हेटमायरने नाबाद ४५ धावा केल्या. हेटमायर वगळता कोणताही फलंदाज फार काळ टिकू शकला नाही. संघाने नऊ विकेट्स गमावत १७८ धावा केल्या. पॅट्रियट्सकडून फिरकीपटू जोस रुसो जागेसर आणि फवाद अहमद यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
हेटमायरने २० चेंडूत ४५ धावा केल्या. त्यापैकी २५ धावा डावाच्या शेवटच्या षटकात आल्या. प्रत्युत्तरादाखल ख्रिस गेलने पॅट्रियट्ससाठी २७ चेंडूत ४२ धावा केल्या, तर एविन लुईसने ३९ चेंडूत नाबाद ७७ धावा केल्या. पॅट्रियट्सनी १३ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सेंट लुसिया किंग्सने मार्क दयालच्या ७८ धावांच्या मदतीने चार बाद २०४ धावा केल्या. त्रिनबागो नाईट रायडर्सने चांगली सुरुवात केली, पण त्यांचे फलंदाज डेविड वीसीच्या शानदार गोलंदाजीपुढे उभे राहू शकले नाहीत. विसीने ३९ धावांत पाच बळी घेतले. नाईट रायडर्सचा संघ १८४ धावांवर बाद झाला. किंग्सने हा सामना १९ धावांनी जिंकला. त्यामुळे अंतिम सामना सेंट लुसिया किंग्स विरुद्ध सेंट किट्स आणि नेविस पॅट्रियट्स या संघात होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘धन्यवाद मलिंगा!’ मुंबई इंडियन्स अशा प्रकारे दिल्या आपल्या ‘चॅम्पियन’ गोलंदाजाला निरोप
टी२० क्रमवारी: विराटने घेतली चौथ्या स्थानी झेप, रोहित टॉप-२० मध्येही नाही