शनिवारी (7 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात सामना खेळला गेला. विश्वचषक 2023 मधील हा चौथा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. क्विंटन डी कॉक, रासी वॅन डर डसेन आणि ऐडन मार्करम यांच्या शतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने 428 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांनी प्रयत्न केले. मात्र, या मोठ्या आव्हानासमोर त्यांचा निभाव लागला नाही व त्यांना 102 धावांनी पराभूत व्हावे लागले. यासह दक्षिण आफ्रिकेने स्पर्धेत विजयी सुरुवात केली.
दक्षिण आफ्रिकेसाठी या सामन्यात सलामीला आलेल्या क्विंटन डी कॉक याने 84 चेंडूत 100 धावा केल्या. तसेच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रासी वॅन डर डसेन याने 110 चेंडूत 108 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तसेच मार्करम याने अवघ्या 54 चेंडूत 106 धावा फटकावल्या. शेवटच्या षटकांमध्ये डेव्हिड मिलर याने धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. अवघ्या 21 चेंडूत 39 धावा करून मिलरने फिनिशरची भूमिका पुन्हा एकदा चोख पार पाडली. यासह दक्षिण आफ्रिकेने 5 बाद 428 धावा उभारल्या.
या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला पहिला धक्का दुसऱ्या षटकात बसला. मात्र, त्यानंतर कुसल मेंडीस याने दक्षिण आफ्रिकेवर प्रतिआक्रमण केले. त्याने केवळ 25 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने संघासाठी 42 चेंडूंमध्ये 76 धावांची खेळी केली. चरिथ असलंका याने देखील काहीसे प्रयत्न करत 79 धावांची खेळी साकारली. श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका याने देखील 68 धावांचे योगदान दिले. कसून रजिथाने काही मोठे फटके खेळत थोडाफार संघर्ष केला तरीदेखील श्रीलंकेला 102 धावांनी पराभव पत्करावा लागला.
(ODI World Cup 2023 South Africa Beat Srilanka By 102 Runs De Kock Dussen Markram Hits Century Shanaka Mendis Fight)
महत्वाच्या बातम्या –
कुसलचा कहर! 429 धावांचा पाठलाग करताना ठोकली वर्ल्डकपमधील फास्टेस्ट फिफ्टी
विश्वचषक इतिहासातील सर्वात वेगवान पाच शतके, मार्करमसह यादीत ‘हा’ आफ्रिकी दिग्गजही सामील