गोवा : ओडिशा एफसी आणि जमशेदपूर एफसी या ‘टॉप फोर’ संघांमध्ये मंगळवारी (१४ डिसेंबर) होणारी हिरो इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) मॅच रंगतदार होण्याची शक्यता आहे.
टिळक मैदान स्टेडियमवर होणाऱ्या लढतीमध्ये ओडिशाचे पारडे थोडे जड आहे. किको रॅमिरेझच्या प्रशिक्षकपदाखालील क्लबने धडाकेबाज सुरुवात करताना चारपैकी तीन सामने जिंकून ९ गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे. सलग दोन विजयांची मालिका केरळा ब्लास्टर्सनी खंडित केली तरी मागील लढतीत नॉर्थ युनायटेड एफसीवर १-० अशी मात करताना ओडिशा पुन्हा विजयी मार्गावर परतला आहे. या सामन्यात त्यांचा सर्वोत्कृष्ट बचाव आणि प्रभावी आक्रमण पुन्हा पाहायला मिळेल.
ओडिशाकडे हेक्टर रोडॅस, व्हिक्टर मोंगिल, जॅव्ही हर्नांडेझ, अड्रियल सुआरेझ आणि जोनाथस असे गुणवान परदेशी फुटबॉलपटू आहेत. यंदाच्या हंगामात त्यांनी आपापल्या पोझिशनवर सुरेख खेळ केला आहे. २०२१-२२ हंगामापूर्वी, ओडिशा एफसीने सहा नवे परदेशी फुटबॉलपटू करारबद्ध केले. अधिकाधिक प्रतिभावंत फॉरेन प्लेअर्सना सामावून घेतल्याचा फायदा क्लबला झाला आहे. पहिल्या चार सामन्यांतील ११पैकी ९ गोल नव्याने करारबद्ध फुटबॉलपटूंनी केलेत.
ओवेन कॉयलचा संघ चांगला खेळ करतोय. त्याच्या क्लबची यंदाची कामगिरी आजवरची सर्वोत्तम आहे. आमच्या खेळाडूंनी त्यांचे ध्येय निश्चित केले आहे. मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करण्याला प्रत्येकाचे प्राधान्य असते. पहिल्या चार सामन्यांत केरळा ब्लास्टर्स वगळता आमचा खेळ उंचावला तरी प्रत्येक सामना वेगळा असतो. जमशेदपूर एफसी एक उत्तम संघ आहे. त्यामुळे सर्व आघाड्यांवर उत्कृष्ट खेळ करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे ओडिशा एफसीचे प्रशिक्षक किको रॅमिरेझ यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले.
जमशेदपूर एफसीने पाच सामन्यांत ८ गुण मिळवलेत. गुणतालिकेत ते चौथ्या स्थानी आहेत. मागील लढतीत मुंबई सिटी एफसीविरुद्ध त्यांनी चांगला खेळ केला. मात्र, चुरशीच्या लढतीत २-४ असा पराभव पाहावा लागला. ०-३ अशा पिछाडीवर असताना दुसऱ्या सत्रात त्यांनी २४ मिनिटांमध्ये दोन गोल करत सुरेख कमबॅक केले. मात्र, पहिल्या हाफमधील बेफिकीरी त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली.
मुंबई एफसीविरुद्धच्या पराभवातून सावरायचे असेल तर आम्हाला ओडिशा एफसीविरुद्ध तीन गुण मिळवावे लागतील. त्यांच्याकडे अनेक चांगले परदेशी खेळाडू आहेत. शिवाय सांघिक खेळही चांगला होत आहे. मात्र, वैयक्तिक चुका टाळल्यास आम्ही विजयीपथावर परतू शकतो, असा विश्वास कर्णधार ओवेन कॉयलला वाटतो.
लुथिनिताचा स्ट्रायकर नेरिजुस वॅलस्किसने चार सामन्यांत तितकेच गोल करताना जमशेदपूरची कामगिरी उंचावण्यात मोलाचे योगदान दिले आहे. मंगळवारी, ओडिशाविरुद्ध तो सातत्य राखेल, असे कर्णधाराला वाटते. ग्रेग स्टीवर्टकडूनही संघाला खूप अपेक्षा आहेत. ओडिशाविरुद्ध जमशेदपूर ४-४-२ अशा फॉर्मेशनने खेळण्याची शक्यता आहे.