हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) मध्ये प्ले ऑफची शर्यत अजून चुरशीची होत जाणार आहे. इथे प्रत्येक सामना जिंकण्यासाठी आता चढाओढ पाहायला मिळेल. नवीन वर्षात पहिल्याच सामन्यात सोमवारी (2 जानेवारी) ओडिशा एफसी घरच्या मैदानावर मुंबई सिटी एफसीचा सामना करणार आहे. या पर्वात आधीच्या सामन्यात मुंबई सिटीने विजय मिळवत तीन गुणांची कमाई केली होती. मुंबई सिटी हा यंदाच्या पर्वातील एकमेव अपराजित संघ आहे. पण कलिंगा स्टेडियमवर ओडिशाविरुद्ध त्यांची कसोटी लागणार आहे, कारण येथे त्यांना एकदाच अनिर्णित निकालावर समाधान मानावे लागले आहे.
ओडिशाला मागील तीन सामन्यात तीन गुण मिळवता आलेले नाहीत आणि तीनही सामन्यांत त्यांना गोल करता आलेला नाही. मागील सामन्यात केरळा ब्लास्टर्सने अखेरच्या 4 मिनिटाला गोल केला अन् ओडिशाचा पराभव केला. त्यात मागील तीनपैकी दोन सामन्यांत एक तरी खेळाडू निलंबनामुळे बाहेर बसला आहे. सोमवारी साऊल क्रेस्पो हा मुंबई एफसीविरुद्ध सुरुवातीच्या फळीत परतण्यासाठी सज्ज आहे. त्याच्यावरही निलंबनाची कारवाई झाली होती.
मुख्य प्रशिक्षक जोसेफ गोम्बाऊ मुंबई सिटीविरुद्ध तगडा संघ मैदानावर उतरवणार आहे. “आम्ही त्याच रणनीतीने मैदानावर उतरणार आहोत आणि चेंडूवर ताबा ठेवून हाय प्रेसिंग सामना खेळणार आहोत. प्रतिस्पर्धी काय खेळतो याची वाट पाहत बसणारा आमचा संघ नाही. मानसिकता कणखर आहे आणि आम्हाला जिंकण्याची हिच संधी आहे,” असे गोम्बाऊ म्हणाले.
मुंबई सिटी नवीन वर्षात अपराजित मालिका कायम राखण्यासाठी सज्ज आहे. उद्याचा विजय त्यांना पुन्हा तालिकेत अव्वल स्थानावर पोहोचवेल. मुंबई सिटीने 11 पैकी 8 सामन्यात विजय मिळवताना 32 गोल केले आहेत. गटविजेत्या हैदराबाद एफसीपेक्षा 8 गोल अधिक मुंबई सिटीने केले आहेत.
ग्रेग स्टीव्हर्ट हा हिरो आयएसएलमध्ये सर्वाधिक गोल सहाय्य करणाऱ्या खेळाडूंमध्ये संयुक्त दुसऱ्या स्थानी आहे. ग्रेगने 11 सामन्यांत 7 गोल सहाय्य केले आहेत आणि 4 गोल केले आहेत. बिपीन सिंग आणि लालीन झुआला छांगटे यांना रोखणे प्रतिस्पर्धीना अवघड आहे.
“खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी मला फार काही करावं लागत नाही, कारण हे सर्व खूप प्रेमळ आणि चांगले खेळाडू आहेत. त्यांच्या कामगिरीवर मी खूप आनंदी आहे. आता आम्हाला आणखी चांगलं काय करता येईल यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल,”असे मुख्य प्रशिक्षक बॅकिंगहॅम म्हणाले.
उभय संघामध्ये 7 सामने झाले आहेत आणि निकाल मुंबई सिटीच्या बाजूने आहेत. मुंबई सिटीने 4 विजय मिळवले आहेत आणि ओडिशाला 3 विजय मिळवता आले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फक्त वीसच! वर्ल्डकपसाठी बीसीसीआयने आखला खास प्लॅन
उशीरा सुचलेले शहाणपण! टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर बीसीसीआयने आयपीएलबाबत घेतला मोठा निर्णय