भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा विद्यमान कर्णधार एमएस धोनी ‘कॅप्टन कूल’ म्हणून प्रसिद्ध आहे. मैदानावरील आपल्या शांत स्वभावासाठी तो ओळखला जातो. रागावर नियंत्रण ठेवून मैदानावर संयमाने खेळ करण्याची त्याची कला अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
क्रिकेटच नव्हे तर इतर खेळातील खेळाडू देखील धोनीची ही गोष्ट आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतात. धोनीचा हा गुण अनेकांना प्रेरणा देत असतो. यातच आता अजून एका खेळाडूची भर पडली आहे.
ऑलिम्पिकपटू घेतोय धोनीकडून प्रेरणा
भारताचा नौकानयनपटू विष्णू सर्वानन आगामी टोकियो ऑलिम्पिक मध्ये सहभागी होणार आहे. सहकारी वरुण ठक्कर आणि नेत्रा कुमानन यांच्यासह तो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. आगामी ऑलम्पिक बाबत बोलतांना विष्णूने धोनी बाबतचा एक खुलासा केला. मैदानात शांत राहण्याची प्रेरणा आपण धोनीकडून घेणार असल्याचे तो यावेळी म्हणाला. आभासी पत्रकार परिषदेत बोलतांना त्याने हे वक्तव्य केले.
आगामी ऑलिम्पिकसाठी काय योजना आहे, यावर बोलतांना विष्णू म्हणाला, “स्पर्धेकडे मी एक शिकण्याची संधी म्हणून बघतो आहे. टॉप-५० स्पर्धकांमध्ये आम्ही येऊ शकलो तर आनंदी असू. आमच्यावर अजिबात दबाव नाही आहे. कारण आम्हाला आमच्या क्षमतेची पूर्ण जाणीव आहे. आम्ही तरुण आहोत आणि आम्हाला अजून खूप काही शिकण्यासारखे आहे. संपूर्ण देशाच्या आमच्याकडून अपेक्षा आहेत. पण आम्हाला एमएस धोनीसारखे शांत राहून आमचे कार्य योग्य पद्धतीने करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.”
धोनी सध्या खेळतोय आयपीएल
दरम्यान, एमएस धोनी बाबत बोलायचे झाल्यास त्याने मागील वर्षी १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर तो आयपीएल खेळत असून ९ एप्रिलपासून सुरू झालेल्या आयपीएलच्या यंदाच्या हंगामात देखील तो चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचे नेतृत्व करतांना दिसतो आहे. आत्तापर्यंत या हंगामात चेन्नईच्या संघाने ४ सामने खेळले असून त्यातील ३ सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभव स्विकारला आहे.
महत्वाच्या बातम्या:
लिलावात नाकारलं तरी मॅक्लेनघनचा इमान मुंबईपाशी, संघ अखेरच्या स्थानी राहिल्यास विकणार सर्व साहित्य
आकाशी ड्रेस अन् चेहऱ्यावर गोड स्माईल; मिसेस बुमराहच्या फोटोवर जस्सी घायाळ, दिली अशी रिऍक्शन





