ओमानने तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात मुंबई संघाचा 3 गडी राखून पराभव केला आहे. याशिवाय ओमानने तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करतांना मुंबई संघाने 7 गडी गमावून 135 धावा केल्या. प्रत्युत्तरात खेळताना ओमानने एक चेंडू शिल्लक असताना 7 बाद 136 धावा करून सामना जिंकला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबईकडून आरक्षित गोमेलने सर्वाधिक 34 धावा केल्या. त्याने या खेळीदरम्यान 29 चेंडूंचा सामना केला. त्याच्याशिवाय सुजित नायकने 20 चेंडूत 25 धावा आणि हार्दिक तमोरेने 16 धावा केल्या. मुंबईच्या फलंदाजांच्या या छोट्या डावांमुळे संघ डावाखेर 7 विकेट्स 135 धावा फलकावर लावू शकला. ओमानच्या संघाने योग्य लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केली, ज्यामुळे मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
आकिब इलियासने सर्वाधिक 3 बळी घेत संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला. याशिवाय खवर अली आणि मोहम्मद नदीम यांनीही 1-1 बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना ओमानचा फलंदाज जतिंदर सिंगने झटपट धावा केल्या. त्याने 28 चेंडूत 46 धावा करून संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. त्याच्याशिवाय, संदीप गौडच्या नाबाद 20 धावा देखील मोलाच्या ठरल्या. मोहम्मद नदीमनेही 19 धावा केल्या. ओमान संघाच्या सांघिक प्रयत्नांमुळे संघाने एक चेंडू शिल्लक राखून रोमहर्षक विजय मिळवला.
तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ओमानने जिंकला होता. यानंतर पुढील सामना मुंबईने जिंकला. शेवटच्या सामन्यात ओमानने विजयाची नोंद करून मालिका जिंकली आहे. टी-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी ओमानने मुंबईला त्यांच्या देशात खेळण्यासाठी बोलावले होते. विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका त्यांच्यासाठी महत्वाची तसेच सर्वोत्तम ठरेल अशी आशा ओमान क्रिकेट बोर्डाला आहे.
ओसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) दुलीप मेंडिस यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) सचिव संजय नाईक यांना हे आमंत्रण पाठवले होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) आमंत्रण स्वीकारले होते.
ओमानने टी-20 विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे आणि आयसीसी स्पर्धेच्या पहिल्या फेरीच्या सहा सामन्यांचेही येथे आयोजन करणार आहे. विश्वचषकातील काही सामने ओमानकडूनही खेळले जाणार आहेत. भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता आयसीसी ही स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये आयोजित करत आहे, ज्याचे आयोजन बीसीसीआय करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘रिषभला स्टान्स का बदलायला सांगितला?’ म्हणत गावसकरांनी चक्क पंचांना ऐकवले नियम
‘या’ कारणामुळे मायकल वॉनचा कोहलीला प्रश्न; म्हणाला, ‘याची उत्तरे तुला द्यावीच लागतील’
‘भारतीय संघ लढवय्या, पण हे लीड्स आहे कोलकाता नाही,’ इंग्लंडच्या माजी क्रिकेटरची चेतावणी