आशियन क्रिकेट कौन्सिल आशिया कप 2025 (Asia Cup 2025) स्पर्धा सुरू होण्यासाठी आता फक्त 1 दिवस उरला आहे. सर्व संघ सज्ज दिसत आहेत. मात्र, बहुतांशांचे लक्ष ओमान आणि यूएई संघाकडे नाही. यावर आता ओमानचा स्टार अष्टपैलू सूफियान महमूद (Sufiyan Mehmood) याने मोठे विधान केले आहे. त्याने आपल्या वक्तव्यातून भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) संघाला थेट चेतावणी दिली आहे. महमूदने सांगितले की त्यांची टीम उलटफेर घडवण्यास सक्षम आहे.
स्पर्धेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सूफियान महमूद म्हणाला, तयारीच्या दृष्टीने, जेव्हा तुम्ही असे सामने खेळता, तेव्हा निडर राहणे महत्त्वाचे असते. गमावण्यासारखे काही नसते. स्वतःची कला दाखवायची असेल, तर भीती दूर करावी लागते. आम्ही भारत-पाकिस्तानला आव्हान देऊ शकतो आणि त्यांच्या विजयाचा मार्ग सोपा होऊ देणार नाही.
महमूदने पुढे सांगितले, जर आम्ही सध्यासारखेच चांगले क्रिकेट खेळलो, तर आम्ही नक्कीच उलटफेर करू शकतो, यावर मला पूर्ण विश्वास आहे. हे विधान मोठं वाटू शकतं, पण आमचा सध्याचा फॉर्म जबरदस्त आहे. त्यामुळे आम्ही आशिया कपमध्ये दमदार कामगिरी करू शकतो. आम्ही सकारात्मक आहोत.
आशिया कप 2025 मध्ये ओमान संघाला भारत आणि पाकिस्तानच्या मुख्य टी20 संघांविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे. या सामन्यांतून ओमानच्या तरुण खेळाडूंना मोठा अनुभव मिळेल. महमूद स्वतः या सामन्यांमध्ये चमकदार खेळ करून स्टार होऊ शकतो. त्याने म्हटले,
ही स्पर्धा आमच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा टप्पा आहे. आम्ही क्रिकेट सुरू केल्यापासून जागतिक दर्जाच्या दिग्गजांविरुद्ध खेळण्याचे स्वप्न पाहिले आहे. या स्पर्धेतील प्रत्येक क्षण आमच्यासाठी ऐतिहासिक असेल, विशेषत भारत-पाकिस्तानविरुद्धचे हे दोन सामने.





