आजच्या काळात यष्टीरक्षक हा क्रिकेटमधील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जातो. कारण, हे यष्टीरक्षक उत्तमरित्या फलंदाजी करत असतात. सलामीवीर म्हणून असो नाहीतर फिनिशर असो, या सर्व जबाबदाऱ्या हे नव्या जमान्यातील यष्टीरक्षक सांभाळताना दिसतात. ऍडम गिलख्रिस्ट, मार्क बाऊचर, एमएस धोनी यांनी यष्टीरक्षकाला क्रिकेटमध्ये प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम केले. मात्र, १९९० पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. यष्टीरक्षक म्हणून संघात असलेल्या खेळाडू फक्त यष्टीरक्षण करायचा. भारताचे माजी यष्टीरक्षक सय्यद किरमाणी हे तर, कधी कधी अकराव्या स्थानावर फलंदाजीला येत. मात्र, याच सय्यद किरमाणी यांनी ‘नाईट वॉचमन’ म्हणून फलंदाजीला येऊन, शतक झळकावत भारताला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला होता. किरमाणी यांच्या त्याच अविस्मरणीय खेळीविषयी, आपण जाणून घेणार आहोत.
पॅकर सर्कसच्या पूर्वीची मालिका
कॅरी पॅकर यांनी १९७९ च्या मध्यात ‘वर्ल्ड सिरीज क्रिकेट’ ची घोषणा केलेली. लोकांनी या स्पर्धेला ‘पॅकर सर्कस’ म्हणून हिणवायला सुरुवात केली होती. टोनी ग्रेग, इम्रान खान आणि मायकेल होल्डिंग यांनी ‘पॅकर सर्कस’ मध्ये सहभागी होण्याचे निश्चित केलेले. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील बरेच मोठे क्रिकेटपटू यात सहभागी होणार होते. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपल आणि प्रमुख वेगवान गोलंदाज डेनिस लिली हे देखील ‘पॅकर सर्कस’ शी करारबद्ध झाले होते. इतर खेळाडूही, लवकरच या अमाप पैसा मिळवून देणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याच्या वाटेवर होते. त्यामुळे, आधीच नियोजित असलेला भारत दौरा प्रमुख ऑस्ट्रेलिया संघाचा अखेरचा दौरा ठरणार होता. या मालिकेनंतर लगेचच, वर्ल्ड सिरीज क्रिकेटला सुरुवात होणार होती.
अनिर्णीत सामन्याने झाली मालिकेला सुरुवात
किम ह्यूज यांच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल झाला. त्यांच्या जोडीला अनुभवी खेळाडू म्हणून फक्त अँड्र्यू हिल्डीथ व ग्रॅहम यालोप होते. युवा ऍलन बॉर्डर, रॉडनी हॉग आणि ब्रूस यार्डली यांच्यावर मोठी जबाबदारी होती. मालिकेत सहा कसोटी सामने खेळवले जाणार होते. पहिली मद्रास कसोटी अनिर्णित राहिली. ऍलन बॉर्डर यांनी दीडशतकी खेळी करत आपली योग्यता पहिल्याच सामन्यात दाखवून दिले. दुसरी बेंगलोर कसोटीदेखील अनिर्णित राहिली. पदार्पण करणाऱ्या शिवलाल यादव यांनी ७ बळी मिळवत चमकदार कामगिरी केली.
तिसरी कसोटी जिंकून भारताने घेतली आघाडी
मालिकेतील तिसरी कसोटी कानपूरमध्ये झाली. पहिली फलंदाजी करताना सुनील गावसकर आणि चेतन चौहान यांनी भारतीय संघाला ११४ धावांची दमदार सलामी दिली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या दिलीप वेंगसरकरांनी देखील अर्धशतकी खेळी केली. एक बाद २०१ अशा सुस्थितीत असताना भारताचा डाव अचानक घसरला. जेफ डायमॉक आणि रॉडनी हॉग यांनी अनुक्रमे ५ आणि ४ बळी घेत भारताचा डाव २७१ वर संपवला. कर्णधार ह्यूज, यालोप आणि डार्लिंग यांनी अर्धशतके करून ऑस्ट्रेलियाला ३३ धावांची आघाडी मिळवून दिली. भारताच्या दुसऱ्या डावात पुन्हा एकदा चेतन चौहान यांनी ८५ धावांची खेळी केली. गुंडप्पा विश्वनाथ यांनीदेखील अर्धशतक साजरे केले. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३४४ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. कपिल देव आणि शिवलाल यादव यांनी चार-चार बळी मिळवत, ऑस्ट्रेलियाचा डाव १२५ धावात गुंडाळला आणि भारताने मालिकेत १-० ने आघाडी घेतली. पुढील दोन्ही कसोटीसुद्धा अनिर्णित राहिल्याने, अखेरची मुंबई कसोटी निर्णायक राहणार होती.
वानखेडेवर निर्णायक कसोटीला सुरुवात
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ३ नोव्हेंबर रोजी दोन्ही संघ मैदानात उतरले. सामना ३ ते ७ नोव्हेंबर अशा पाच दिवसांत खेळला जाणार होता. मात्र, ५ नोव्हेंबर रोजी विश्रांतीचा दिवस ठेवण्यात आलेला. त्यामुळे, सामन्यात फक्त चार दिवसांचा खेळ होणार होता. ऑस्ट्रेलियन संघाने जखमी ब्रुस यार्डली यांच्याऐवजी पीटर स्लीप यांना संधी दिली. भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी नाणेफेक जिंकत, फलंदाजी स्वीकारली.
सुनील गावसकर व चेतन चौहान यांची आश्वासक सुरुवात
संपूर्ण मालिकेत भारतीय संघाच्या सलामीची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या गावसकर-चौहान जोडीने या सामन्यातही अपेक्षेनुसार डावाची सुरुवात केली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी १९२ धावा जोडल्या. फिरकीला अनुकूल असणाऱ्या वानखेडेच्या खेळपट्टीवर पीटर स्लीप आणि जिम हिग्स हे अनुभवहीन गोलंदाज चेंडू वळवण्यात अपयशी ठरत होते. दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या यार्डली यांची उणीव ऑस्ट्रेलिया संघाला चांगलीच भासत होती.
कामचलाऊ फिरकीपटू ऍलन बॉर्डर यांनी करून दिले सामन्यात पुनरागमन
डायमॉक यांनी चेतन चौहान यांना वैयक्तिक ७३ धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. दुसरीकडे, गावसकर यांनी तब्बल पाच तास फलंदाजी करत; ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चांगलेच थकवले होते. आपले २२ वे कसोटी शतक झळकावताना त्यांनी संयम आणि आक्रमणाचा योग्य मिलाफ साधला. गावसकरांच्या खेळीने ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर जात होता. मात्र, पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी काही षटके शिल्लक असताना; कामचलाऊ फिरकीपटू ऍलन बॉर्डर यांनी गावसकर आणि वेंगसरकर यांना पाठोपाठ बाद करत, ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुनरागमन करून दिले.
दिवसातील अखेरचे षटक खेळण्यासाठी, गुंडाप्पा विश्वनाथ यांच्यासमवेत ‘नाईट वॉचमन’ म्हणून यष्टिरक्षक असलेले सय्यद किरमाणी मैदानात उतरले. किरमाणी आपल्या फलंदाजीसाठी तितके प्रसिद्ध नव्हते. उरलेल्या वेळात प्रमुख फलंदाज बाद होऊ नये म्हणून, ‘नाईट वॉचमन’ ची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. पहिल्या दिवसाअखेर, भारताची धावसंख्या तीन बाद २३१ अशी होती.
‘नाईट वॉचमन’ सय्यद किरमाणी यांची विक्रमी शतकी खेळी
दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाला आणि हिग्स यांनी विश्वनाथ यांना झटपट तंबूत पाठवले. रॉडनी हॉग यांनी यशपाल शर्मा व अष्टपैलू मोहिंदर अमरनाथ यांना एकेरी धावसंख्येवर बाद करत, भारताची अवस्था सहा बाद २८१ केली. युवा अष्टपैलू कपिल देव यांच्यासमवेत ४६ धावांची भागीदारी करत; किरमाणींनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कपिल देव हे फिरकीपटू हिग्स यांच्या गोलंदाजीवर १७ धावा काढून परतले.
कपिल देव बाद झाल्यानंतर, भारताचा डाव झटपट संपेल असे सर्वांना वाटत होते. मात्र, आपल्या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या करसन घावरी यांच्या मनात काहीतरी वेगळेच होते. आत्मविश्वासाने खेळत असलेल्या, किरमाणी यांना साथ देत त्यांनी डाव पुढे नेण्यास सुरुवात केली. डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी करण्याचे दुहेरी कौशल्य घावरी यांच्याकडे होते. आज ते आपल्यातील आक्रमक फलंदाजाचे दर्शन सर्वांना घडवणार होते.
करसन घावरी यांची फटकेबाजी
घावरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये तळाचे चांगले फलंदाज म्हणून प्रसिद्ध होते. मात्र, भारतासाठी खेळलेल्या २७ कसोटीत ते अवघे एक अर्धशतक बनवू शकलेले. आज मात्र त्यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत १२ चौकार व तीन षटकारांच्या सहाय्याने त्यांनी ९९ चेंडूत ८६ धावा फटकावल्या. किरमाणी व घावरी जोडीने आठव्या गड्यासाठी १२७ धावा जोडत, भारताला चांगली धावसंख्या उभारून दिली होती. घावरी ८६ धावा काढून बाद झाले, तेव्हा किरमाणी आपल्या शतकापासून सहा धावा दूर होते.
नवव्या क्रमांकवर आलेल्या शिवलाल यादव यांनी उत्तम बचाव करत, किरमाणी यांचे शतक होण्यासाठी मदत केली. पाच तास धैर्याने फलंदाजी केलेल्या किरमाणी यांनी, हिग्स यांच्या चेंडूवर दोन धावा काढून, आपले शतक पूर्ण केले. ‘नाईट वॉचमन’ म्हणून फलंदाजीला येत शतक झळकवणारे किरमाणी क्रिकेट इतिहासातील अवघे तिसरे फलंदाज ठरले होते. यापूर्वी पाकिस्तानचे नसीम घणी व ऑस्ट्रेलियाच्या टोनी मान यांनी ही कामगिरी केली होती.
भारताचा ऐतिहासिक मालिका विजय
किरमाणी यांच्या शतकानंतर कर्णधार सुनील गावसकर यांनी ४५८ धावांवर भारताचा डाव घोषित केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा, ऑस्ट्रेलियाने बिनबाद १५ धावा बनवल्या. तिसरा दिवस हा विश्रांतीचा होता. चौथ्या दिवशी डाव सुरू झाला आणि भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची शिकार करण्यास सुरुवात केली. दिलीप दोशी आणि शिवलाल यादव या दोन्ही फिरकीपटूंनी मिळून ९ गडी बाद करत; ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १६० धावांवर संपुष्टात आणला. ऑस्ट्रेलियाकडून अनुभवी ग्रॅहम यालोप यांनी ६० धावांची खेळी केली.
तिसऱ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात, ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन देत भारताने पुन्हा गोलंदाजी सुरू केली. कपिल देव व करसन घावरी यांनी हिल्डिथ व यालोप यांना १७ धावात माघारी पाठवले. तिसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा, ऑस्ट्रेलियाची स्थिती २ बाद ६० अशी होती.
अखेरच्या दिवशी भारताच्या विजयाची औपचारिकता बाकी होती. मात्र, कर्णधार किम ह्यूज व युवा ऍलन बॉर्डर यांनी निग्रहाने फलंदाजी चालू ठेवली. दोघांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली. कपिल देव यांनी ह्यूज यांना वैयक्तिक ८० धावांवर बाद केले आणि भारतासाठी विजयाचे दरवाजे उघडले गेले. दिलीप दोशी व कपिल देव यांनी त्यानंतर एकाही ऑस्ट्रेलियन फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या गाठून दिली नाही. जिम हिग्ज यांचा त्रिफळा उडवत, कपिल देव यांनी सामन्याची आणि मालिकेची अखेर केली. ऑस्ट्रेलियाला एक डाव व १०० धावांनी पराभव पत्करावा लागला.
भारताने ऑस्ट्रेलियाला प्रथमच कसोटी मालिकेत पराभूत करण्याची कामगिरी केली होती. सय्यद किरमाणी यांच्या विक्रमी शतकाचे या ऐतिहासिक कामगिरी महत्त्वपूर्ण योगदान होते.






