क्रिकेट हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक असा खेळ आहे. क्रिकेटमध्ये अनेक प्रकारचे स्वरूप आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा आणि जुने स्वरूप म्हणजे कसोटी क्रिकेट. क्रिकेटची सुरूवातच कसोटी सामन्यापासून झाली होती, असे म्हटले तरी चूकीचे ठरणार नाही. कसोटीचे स्वरूप हे असे स्वरूप आहे, जिथे खेळाडूंना आपले कौशल्य पणाला लावावे लागते.
कसोटी सामन्यात एका सत्रात देखील पूर्ण सामन्याचा निकाल बदलू शकतो. असेच काहीसे १८८२ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एका कसोटी सामन्यात घडले. हा सामना इंग्लंडच्या ओवल मैदानात सुरू होता. तसेच या सामन्याचा निकाल २९ ऑगस्ट १८८२ रोजी आला होता. यामध्ये इंग्लंड संघाला जिंकण्यासाठी केवळ ८५ धावा हव्या होत्या आणि एकवेळ ५१ धावांवर ३ विकेट अशी अवस्था असताना देखील इंग्लंडचा संघ हा सामना ७ धावांनी हरला.
यानंतर या सामन्याला क्रिकेट जगतात इतिहासातील सर्वात रोमहर्षक सामन्यांपैकी एक म्हणून गणले जाऊ लागले. तसेच याच कारणामुळे ऐतिहासिक ऍशेस मालिकेचा देखील जन्म झाला.
हा सामना ओव्हलच्या मैदानात २८ ऑगस्ट १८८२ साली सुरू झाला होता. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बिली मर्डोकचा हा निर्णय पूर्णपणे चुकला. ज्यामुळे इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात केवळ ६३ धावांत गुंडाळले.
या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या इंग्लंडची अवस्था देखील ऑस्ट्रेलिया सारखीच राहिली. पहिल्या डावात इंग्लंडने केवळ १०१ धावा केल्या. यामध्ये इंग्लंडचा गोलंदाज फ्रेड्रिक स्पोफोर्थ ने ४६ धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या.
ज्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात देखील असमाधानकारक कामगिरी करत, केवळ १२२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ह्यूज मेसीची अर्धशतकी खेळी सोडल्यास इतर कोणताही फलंदाज इंग्लंड समोर टिकू शकला नाही. ज्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मर्डोक देखील केवळ २९ धावाच जोडू शकला. ज्यामुळे इंग्लंडला केवळ ८५ धावांचे लक्ष्य मिळाले.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडने हा सामना सहज आपल्या नावे केला असता. एकवेळ इंग्लंडची अवस्था ३ विकेटच्या बदल्यात ५१ धावा अशी होती. मात्र ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्पोफोर्थने पुन्हा भेदक गोलंदाजी केली. आणि केवळ ४४ धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या. ज्यामुळे इंग्लंडला हातातील हा सामना ७ धावांनी गमवावा लागला.
स्पोगोर्थने या सामन्यात ९० धावा देऊन तब्बल १४ विकेट घेतल्या. ही आजही ऑस्ट्रेलियाकडून कसोटीमध्ये केलेले सर्वोत्तम दुसरे प्रदर्शन आहे. ऑस्ट्रेलियाकडून एका सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम बॉब मॅसी यांच्या नावे आहे. त्यांनी १९७२ साली इंग्लंड विरुद्धच १३७ धावा देऊन १६ विकेट घेतल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाने प्रथमच इंग्लंडला त्यांच्या मायभूमीत हरवले होते. हा सामना केवळ दोनच दिवसांमध्ये संपला. हा पराभव इंग्लंडच्या चाहत्यांना अजिबात पचनी पडला नाही. ज्यामुळे पुढच्याच दिवशी ‘द स्पोर्टिंग टाइम्स’ या वृत्तपत्राने एक शोक संदेश छापला. ज्यामध्ये त्यांनी इंग्लंडच्या पराभवावर लिहिले होते की, “इंग्लंड क्रिकेटचा मृत्यू झाला आहे आणि अंतिम संस्कारासाठी याची राख ऑस्ट्रेलियाला नेली जाणार आहे.”
ज्यानंतर पुढच्याच वर्षी आयवाे ब्लिकच्या कर्णधारपदात इंग्लंड ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला. तेव्हा इंग्लंडच्या माध्यमांनी या दौऱ्याला ऍशेस म्हणजेच राख आणण्यासाठीची मालिका म्हणून संबोधले आणि अशाच पद्धतीने आजच्या ऐतिहासिक ऍशेस मालिकेची सुरुवात झाली. तसेच इंग्लंडने मागील पराभवाचा बदला घेत ऑस्ट्रेलियाला २-१ ने हरवले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडला धक्का! केन विलियम्सन ‘इतक्या’ दिवस राहणार क्रिकेटपासून दूर
ऑस्ट्रेलिया-इंग्लंड संघात रंगणार ७२ वी ऍशेस मालिका; कुठे, कधी पाहू शकाल पहिला सामना, जाणून घ्या