१४ ऑगस्ट १९९०, मैदान : ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर, अँगस फ्रेझरच्या चेंडूला लॉंग ऑफला ढकलत दोन धावा घेतल्या गेल्या आणि १०० शतकांच्या विश्वविक्रमाकडे पहिले पाऊल टाकले गेले. १७ वर्ष ११२ दिवस वयाच्या किशोरवयीन मुलाने आपल्या पहिल्याच इंग्लंड दौऱ्यावर शतक साजरे केले होते. कमी वयात कसोटी शतक झळकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आला. त्या मुलाचे नाव सचिन रमेश तेंडुलकर.
मालिकेतील पहिली कसोटी, लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंडने सहज जिंकली होती. दुसरा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने कर्णधार ग्रॅहम गूच, मायकेल आथर्टन आणि रॉबिन स्मिथच्या शतकांच्या जोरावर धावफलकावर भल्यामोठ्या ५१९ धावा लावल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने, कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या १७९ धावांच्या मदतीने ४३२ धावा काढल्या. मुंबईकर संजय मांजरेकरने ९३ व १७ वर्षीय दुसरा मुंबईकर सचिन तेंडुलकरने ६८ धावा काढत त्याला साथ दिली.
इंग्लंडच्या दुसर्या डावात ऍलन लॅम्बच्या शतकाने यजमानांनी चार बाद ३२० धावांवर डाव घोषित केला. भारतासमोर ९० षटकात ४०८ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. सिद्धू व रवी शास्त्री ही सलामीची जोडी लवकरच तंबूत परतली. वेंगसरकर-मांजरेकर या मुंबईकर जोडीने भारताचा डाव सावरला. दोघानी ७४ धवांची भागिदारी केली असता, मांजरेकर वैयक्तिक ५० धावा काढून हेमिंग्जच्या गोलंदाजीवर बाद झाला. पाठोपाठ वेंगसरकर सुद्धा लुईसच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाले.
आता सर्व आशा कर्णधार अझरुद्दीन व युवा सचिनवर होत्या. अझरुद्दीनने दोन चौकार मारत सुरुवात केली. मात्र, हेमिंग्सला उंचावरून मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. भारताची अवस्था पाच बाद १२७ अशी झाली होती. दुसरा पराभव समोर दिसत होता.
कोवळ्या सचिनला साथ देण्यासाठी सर्वात मुरब्बी कपिल देव आले. कपिल नेहमीच्या आक्रमक अवतारात दिसत होते. ३५ चेंडूत झटपट २६ धावा बनवत त्यांनी देखील पव्हेलियनचा रस्ता धरला. आता मात्र, भारतीय संघात भीतीचे वातावरण तयार झाले होते. वरीष्ठ फलंदाज बेजबाबदार फटके मारुन बाद झालेले. सामना वाचविण्याची जबाबदारी दोन युवा खेळाडू सचिन तेंडुलकर व मनोज प्रभाकर यांच्यावर होती. हेमिंग्सचा चेंडू चांगलाच वळत होता तर, फ्रेझर, माल्कम व लुईस वेगात गोलंदाजी करत होते.
सचिन-मनोज जोडीने डाव विणायला सुरुवात केली. इंग्लंडच्या गोलंदाजांना दाद न देता दोघांनी धावफलक हलता ठेवला. दोन्ही खेळाडूंनी वैयक्तिक अर्धशतके झळकावली.
अखेरीस, सचिनने फ्रेझरच्या चेंडूवर दोन धावा घेत आपले पहिलेवहिले शतक पूर्ण केले. ओल्ड ट्रॅफर्डवरील हजर असलेल्या सर्व प्रेक्षकांनी व टेलिव्हिजनवर सामना पाहणाऱ्या असंख्य क्रिकेट चाहत्यांनी छोट्या सचिनच्या त्या धाडसी खेळीचे टाळ्या वाजवून कौतुक केले. सचिन व मनोज जोडीने अखेरपर्यंत नाबाद राहत सामना अनिर्णित राखला. सचिनने १८९ चेंडूत ११९ तर मनोजने १२८ चेंडूत नाबाद ६८ धावा केल्या. दोन्ही डावातील शानदार कामगिरीमुळे सचिन सामन्याचा मानकरी ठरला.
#OnThisDay in 1990: @sachin_rt, aged 17, scored his first international 💯 as #TeamIndia took on England in Manchester. 👏 👏
The rest, as they say, is history! 🙌 🙌 pic.twitter.com/rAKD3Zfc6Q
— BCCI (@BCCI) August 14, 2021
याच सचिनने, पुढे जावून १०० शतकांचा दैदिप्यमान विश्वविक्रम केला. २०० कसोटी खेळत १५,९२१ धावा त्याने आपल्या खात्यात नोंद केल्या.
योगायोगाने, १९४८ मध्ये १४ ऑगस्ट याचदिवशी, सर्वकालीन महान क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांनी आपली शेवटची खेळी केली होती. १०० ची सरासरी गाठण्यासाठी चार धावांची आवश्यकता असताना ते शून्य धावेवर बाद झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
अखेर चाहत्यांच्या मागणीला यश! लिजेंड्स लीगमधून गिब्सचा काढता पाय; हा ऑसी दिग्गज घेणार जागा
सोशल मीडियावर का ट्रेंड होतोय बॉयकॉट सौरव गांगुली?
जेव्हा दिल्ली डेअरडेविल्सच्या संघमालकाने पूर्ण संघाला घडवलेली ताजमहालची सफर