आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजीतील बहुतांशी विक्रम हे भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या नावे अजूनही जमा आहेत. डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर त्याला सर्वात परिपूर्ण फलंदाज म्हटले गेले होते. त्याच्या याच विक्रमांच्या माळेतील एक महत्त्वाचा विक्रम आजच्या दिवशी (२९ जून) १५ वर्षांपूर्वी झालेला. वनडे क्रिकेटमध्ये सर्वप्रथम १५,००० धावांचा पल्ला सचिनने आजच्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गाठला होता. विशेष म्हणजे त्यानंतर ही कामगिरी आजतागायत कोणत्याही दुसऱ्या फलंदाजाला करता आली नाही.
सन २००७ मध्ये वनडे विश्वचषकात अपयश आल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर गेला होता. त्या ठिकाणी प्रथम आयर्लंडला वनडे मालिकेत पराभूत केल्यानंतर भारतीय संघाची दक्षिण आफ्रिका विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका होणार होती. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभूत व्हावे लागले.
आणि सचिनने केला आंतरराष्ट्रीय विक्रम
बेलफास्ट येथील दुसऱ्या सामन्यात उतरताना भारताचा विक्रमादित्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला वनडे कारकिर्दीत १५,००० धावा गाठण्याचा विक्रम खुणावत होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २२६ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला सचिन तेंडुलकर व सौरव गांगुली या जोडीने १३४ धावांची धमाकेदार सलामी दिली. सचिन, गांगुली, राहुल द्रविड व एमएस धोनी हे चार फलंदाज आठ धावांच्या अंतराने माघारी परतल्यानंतर ही युवराज सिंग व दिनेश कार्तिक यांनी भारताला आरामात विजय मिळवून दिला.
या सामन्यात ९३ धावांची वेगवान खेळी करणाऱ्या सचिनला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. सचिनने या खेळीदरम्यान वनडे क्रिकेटमध्ये १५००० धावा पूर्ण केल्या. त्यानंतर अशी कामगिरी कोणताही दुसरा फलंदाज करू शकला नाही.
🗓️ #OnThisDay in 2007:
India legend @sachin_rt became the first batsman to reach 15,000 runs in ODIs, and so far he's the only one to have achieved the feat 🙌 pic.twitter.com/jfwzULr93B
— ICC (@ICC) June 29, 2021
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
सचिन तेंडुलकरच्या नावे आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये ४६३ वनडेमध्ये ४४.८३ च्या सरासरीने ४९ शतके व ९६ अर्धशतकांच्या मदतीने १८,४२६ धावा जमा आहेत. या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी श्रीलंकेचा कुमार संगकारा आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत ४०४ वनडे सामने खेळत १४,२३४ धावा फटकावल्या होत्या. तिसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंगच्या नावे १३,७०४ तर, चौथ्या क्रमांकावर असलेल्या सनथ जयसूर्याच्या नावे १३,४३० वनडे धावा जमा आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असलेल्या विराट कोहलीने आतापर्यंत २५४ सामन्यात १२,१६९ धावा बनविल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
आयर्लंडसाठी ‘कर्दनकाळ’ ठरला दीपक हुड्डा, शतक ठोकत रोहित शर्मावरही ठरला वरचढ
दीपक हुड्डाचं वादळ, टी२०त अवघ्या ‘इतक्या’ चेंडूत शतक; बनला सर्वात वेगवान सेंचूरी करणारा चौथा भारतीय