28 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असं काही घडलं होतं, जे कोणत्याही खेळाडूला किंवा चाहत्याला लक्षात ठेवायला आवडणार नाही. 13 मार्च 1996 चा तो दिवस होता. हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ‘काळा दिवस’ म्हणून नेहमी स्मरणात राहील. या दिवशी भारत आणि श्रीलंका यांच्यात 1996 च्या विश्वचषकाचा उपांत्य सामना झाला होता.
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्याचा विचार करताच संतप्त चाहते आणि विनोद कांबळीचा रडवेला चेहरा आजही आठवतो. भारतीय फलंदाजी कोलमडल्यानंतर स्टेडियममधील प्रेक्षक आक्रमक झाले आणि त्यांच्यामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि अखेर श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आलं.
1996 मध्ये भारतात एकदिवसीय विश्वचषकाचं संयुक्तपणे आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत भारतीय संघानं मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली. मात्र दुर्दैवानं उपांत्य फेरीत भारताला श्रीलंकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. 13 मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर हा सामना खेळला गेला.
या सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. प्रथम फलंदाजी करताना अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघानं 8 गड्यांच्या मोबदल्यात 251 धावा केल्या. श्रीलंकेकडून अरविंद डी सिल्वानं 66 धावांची खेळी केली. तर भारताकडून जवागल श्रीनाथनं 3 आणि सचिन तेंडुलकरनं 2 बळी घेतले. यानंतर दुसऱ्या डावात जे घडलं ते अत्यंत वाईट होतं.
श्रीलंकेनं दिलेल्या 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एका वेळी भारतीय संघाची 98 धावांवर 1 विकेट अशी चांगली स्थिती होती. मात्र सचिन तेंडुलकर बाद झाल्यानंतर संघाची फलंदाजी कोलमडली. यानंतर भारतीय संघानं अवघ्या 120 धावांत 8 विकेट गमावल्या. 35 वे षटक संपणार होतं आणि भारतीय संघाला 156 चेंडूत 132 धावा हव्या होत्या. मात्र हे अशक्य वाटत होतं. विनोद कांबळी (10) आणि अनिल कुंबळे (0) क्रीजवर होते.
यानंतर प्रेक्षकांनी मैदानावर बाटल्या फेकून जाळपोळ सुरू केली. प्रेक्षकांनी स्टेडियमच्या एका भागात बसण्याची जागा पेटवली होती. यामुळे सामना येथेच थांबवावा लागला. त्यानंतर सामनाधिकारी क्लाइव्ह लाइड यांनी श्रीलंकेला विजयी घोषित केलं. सामन्याची ही अवस्था पाहून नाबाद राहिलेला कांबळी मैदानावरच रडू लागला. त्याचे अनेक फोटो व्हायरल झाले आहे. आता ईडन गार्डन्समधील हा सामना आठवणीत राहतो जाळपोळ आणि मैदानावर प्रेक्षकांनी फेकलेल्या बाटल्या, चप्पल आणि बूट यामुळेच.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ फलंदाजानं दारूच्या नशेत खेळली होती ऐतिहासिक खेळी, आजही विश्वविक्रम कायम
IPL 2024 पूर्वी बंगळुरूमध्ये तीव्र पाणीटंचाई, RCB चे सामने कुठे खेळले जाणार?