भारत देशात क्रिकेटला खूप जपले जाते. भारतात विश्वचषकाचा सामना असल्यास भारतीय चाहते आपले काम सोडून टीव्हीसमोर थाट मांडून बसतात किंवा पाण्यासारखा पैसा खर्च करत प्रत्यक्षात सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जातात. पण, तुम्हाला माहिती आहे का की, भारतातील लोक क्रिकेटवर एवढे प्रेम का करतात आणि क्रिकेटसाठी इतके वेडे का आहेत? खर तर, याची सुरुवात ३७-३८ वर्षांपूर्वी झाली. हो, हे खरे आहे. भारतात क्रिकेटला पसंती खऱ्या अर्थाने १९८३च्या विश्वचषक विजयानंतर मिळू लागली.
आज १९८३च्या विश्वविजयी संघासाठी मोठा दिवस आहे. चला तर मग मंडळी, जाणून घेऊया आजच्या दिवसामागील महत्तेचे कारण
भारतीय संघाने या १९८३च्या विश्वचषकातील एक एक संघांना हरवत उपांत्यफेरीत मजल मारली. उपांत्यफेरीत येण्यापूर्वी भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडीज संघाला साखळी सामन्यात हरवून सगळ्यांना आश्चर्यचकित केले होते. भारतीय संघाला आता या स्पर्धेत ‘डार्क हॉर्स’ म्हणून संबोधू जावू लागले. परंतु, त्यांच्यापुढील सर्वात मोठे आव्हान होते ते उपांत्यफेरी सामन्याचे आणि हा सामना होता आयोजक इंग्लंडविरुद्ध.
इंग्लंडचा संघ घरच्या मैदानावर खेळत असल्याने त्यांना त्याचा खूप फायदा मिळत होता. आणि इंग्लंड संघ सुद्धा साखळी फेरी सामन्यांत जबरदस्त कामगिरी करून आला होता. त्यामुळे आता भारतीय संघापुढे खूप कठीण आव्हान होते.
मॅन्चेस्टर येथे रंगलेल्या उपांत्यफेरी सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ग्रीम फॉलर और क्रिस टैवरी यांच्या सलामीने इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ६९ धावा जोडल्या. रॉजर बिन्नीने पहिले टैवरी आणि मग फॉलरला बाद केले. त्यानंतर मोहिंदर अमरनाथ यांनी डेविड गावर आणि माइक गैटिंग या फलंदाजांची विकेट काढली. एलेन ल्यांबला यशपाल शर्मा यांनी धावचीत केले. इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळू इयान बॉथमला कीर्ति आजादने बाद केले आणि कर्णधार कपिल देव यांनी इंग्लंड संघाची खालची फळी उध्वस्त केली. परिणामत इंग्लंड संघाने ६० षटकांत एकूण २१३ धावा केल्या.
इंग्लंडच्या २१४ धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या भारतीय संघातील सलामी जोडीने संघाला संथ गतीने सुरुवात करून दिली. मेनचेस्टरच्या खेळपट्टीवर श्रीकांत यांना खेळण्यात थोडा त्रास होत होता. सुनील गावसकर २५ धावा करून बाद झाले. त्यानंतर गावस्करांच्या पाठोपाठ श्रीकांतसुद्धा बाद झाले. त्यानंतर मोहिंदर अमरनाथ आणि यशपाल शर्मा यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९२ धावा जोडल्या. या महत्वपूर्ण भागीदारीने पुन्हा भारतीय संघाला सामन्यात उभे केले. दरम्यान, अमरनाथ ४६ धावा करून बाद झाले आणि सामना पुन्हा इंग्लंडकडे झुकला.
पाचव्या क्रमांकावर संदीप पाटील यांनी ताबडतोड फलंदाजी करून इंग्लंडच्या गोलंदाजाना दबावात आणले. पाटील यांनी ३२ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या आणि यशपाल शर्मा ६१ धावा करून बाद झाले. पाटील यांच्या तुफानी खेळीने भारतीय संघाला ३२ चेंडू राखून ६ विकेट्सने विजय मिळवून दिला आणि भारताने १९८३ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला.
महत्त्वाच्या बातम्या-
वनडे क्रिकेटच्या इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा डेविड वॉर्नर ठरला दुसराच खेळाडू
ENGvsIND: रोहितच्या उपस्थितीत विराटच निभावतोय कर्णधाराची भुमिका, नेमके कारण काय?