मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं भलेही क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन जवळपास एक दशक झालं, मात्र अजूनही त्याची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. सचिनना क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव खेळाडू आहे, ज्याला त्याच्या फलंदाजीमुळे चक्क देवाचा दर्जा मिळाला. सचिन तेंडुलकरनं वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याकाळी त्यानं जगातील अनेक महान गोलंदाजांचा सामना केला. सचिनच्या बॅटमधून पहिलं शतक 1990 मध्ये इंग्लंडविरुद्ध आलं होतं. त्यावेळी तो अवघ्या 17 वर्षांचा होता!
सचिननं आजच्याच दिवशी (14 ऑगस्ट) 1990 मध्ये मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर आपल्या फलंदाजीनं खळबळ उडवून दिली होती. त्यानं चौथ्या डावात टीम इंडियासाठी 119 धावांची नाबाद खेळी खेळली, ज्यामुळे भारतीय संघ सामना अनिर्णित ठेवण्यात यशस्वी ठरला. या खेळीत सचिननं 189 चेंडूंचा सामना केला, ज्यात त्यानं एकूण 17 चौकार मारले. या सामन्यात सचिननं पहिल्या डावातही 68 धावांची दमदार खेळी खेळली होती.
सचिन तेंडुलकर जगातील एकमेव असा खेळाडू आहे, ज्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं आहेत. सचिननं कसोटीत 51 आणि एकदिवसीय मध्ये 49 शतकं ठोकली आहेत. सचिननं भारतासाठी 200 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्याच्या नावे 15921 धावा आहेत. सचिनची कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या नाबाद 248 धावा आहे.
सचिन तेंडुलकरनं भारतासाठी 463 एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये त्याच्या नावे 18,426 धावा आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतकं झळकावण्यासोबतच त्यानं 96 अर्धशतकंही ठोकली आहेत. सचिनची या फॉरमॅटमधील सर्वोच्च धावसंख्या 200 धावा आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा सचिन जगातील पहिला फलंदाज आहे.
हेही वाचा –
श्रीलंकेची दुहेरी चाल; प्रतिस्पर्धांच्या संघातील खेळाडूलाचं बनवलं फलंदाजी प्रशिक्षक
भारत वि. बांगलादेश सामन्याचे ठिकाण बदलले, ‘या’ स्टेडियममध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय मॅच होणार
कसोटी मालिकेपूर्वी संघाला मोठा धक्का, कर्णधार गंभीर जखमी