---Advertisement---

दिनविशेष : झुंजार शतकानंतरही पाकिस्तानच्या हातून भारताचा पराभव, ड्रेसिंग रूममध्ये ढसाढसा रडला होता तेंडूलकर

On: सोमवार, जानेवारी 31, 2022 11:35 AM
Pakistan-Team-Sachin-Tendulkar
---Advertisement---

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याची जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणना केली जाते. सचिनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील एकाहून एक जबरदस्त अविश्वसनीय खेळी केल्या होत्या. आजच्या दिवशी १९९९ साली कट्टर विरोधक भारत आणि पाकिस्तान संघात एक रोमहर्षक कसोटी सामना झाला होता. या सामन्यात सचिनने झुंजार शतकी खेळी केली होती. तरीही शेवटी भारतीय संघाच्या वाट्याला पराभव आला होता. यामुळे हताश होऊन सचिन खूप रडला होता.

अवघ्या १२ धावांनी पाकिस्तानने केला होता भारताचा पाडाव
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर २८ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत हा कसोटी सामना खेळला गेला होता. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघ केवळ २३८ धावांवर गारद झाला होता. यष्टीरक्षक फलंदाज मोईन खान यांच्या सर्वाधिक ६० धावांचा यात समावेश होता. सोबतच मोहम्मद युसुफ यांच्या अर्धशतकी खेळीचे योगदान दिले होते. भारतीय फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी चमकदार कामगिरी करत सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या होत्या.

प्रत्युत्तरात राहुल द्रविड (५३ धावा) आणि सौरव गांगुली (५४ धावा) यांच्या अर्धशतकामुळे भारताने २५४ धावा करत होत्या. पुढे दुसऱ्या डावात तत्कालिन पाकिस्तानी सलामीवीर शाहिद आफिद्री याने शतक ठोकले होते. आफ्रिदीच्या या आक्रमक फलंदाजीमुळे पाकिस्ताने दुसऱ्या डावात भारताला २७० धावांचे आव्हान दिले होते.

राहुल द्रविड, मोहम्मद अझरुद्दीन, व्हिव्हिएस लक्ष्मण, सौरव गांगुली, सचिन तेंडूलकर यांच्यासारखे फलंदाज असल्याने सहज भारतीय संघ पाकिस्तानचे आव्हान गाठेल, याची सर्वांना अपेक्षा होती. मात्र दुसऱ्या डावातील २५ षटके संपायच्या आतच संघाचे आघाडीचे तीन फलंदाज बाद झाले. परंतु सचिन आणि नयन मोंगिया यांनी शतकी भागिदारी साकारत संघाचा डाव सावरला. अशात पाकिस्तानचा गोलंदाज वसीम अक्रमने ५२ धावांवर मोंगियाला झेलबाद करत त्यांची भागिदारी मोडली.

पुढे सचिनने चिवट झुंज देत २७३ चेंडूत १८ चौकारांच्या मदतीने १३६ धावांची अश्विसनीय खेळी केली होती. विशेष म्हणजे, पाठीत वेदना होत असताना सचिनने लढावू वृत्ती दाखवत जिद्दीने फलंदाजी केली होती. परंतु पाकिस्तानी गोलंदाज सकलेन मुश्ताकने वसीम अक्रमच्या हातून सचिनला झेलबाद केले. त्यानंतर भारताचे खालच्या फळीतील फलंदाजांना दोन आकडी धावाही करता आल्या नाहीत. आणि अखेर फक्त १२ धावांनी पाकिस्तानने भारताला नमवले.

पराभवानंतर रडला होता सचिन तेंडूलकर 
भारतीय संघाने तो सामना गमावल्यानंतर सचिनने स्वत:ला संघाच्या पराभवासाठी कारणीभूत समजले होते. बीसीसीआयचे अधिकारी राज सिंग डूंगरपुर यांनी याविषयी एका मुलाखतीत खुलासा केला होता. त्यांनी सांगितले होते की, “सचिन तेंडूलकर १९९९ मधील चेन्नई कसोटीतील भारतीय संघाच्या पराभवासाठी आपण जबाबदार असल्याचे मानले होते. यामुळे तो ड्रेसिंग रूममध्ये जाऊन ढसाढसा रडला होता. मी आणि तत्कालिन प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांनी त्याची खूप समजूत काढली. तरीही त्याचे अश्रू काही थांबण्यास तयार नव्हते.”

महत्त्वाच्या बातम्या-

वयाच्या पाचव्या वर्षी ज्याला पाहून क्रिकेटर होण्याचा निर्णय घेतला, त्याच्याच समोर ऋतुराजने केली दमदार खेळी

चालू सामन्यात अंपायरला शिवीगाळ करत खेळाडूने ओढवले संकट, झाला लाखोंचा दंड

…आणि पाकिस्तानी क्रिकेटरने मैदानावरच घातला क्विंटन डी कॉकशी वाद, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---