ऑस्ट्रेलिया संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न (shane Warne) हा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा दुसरा गोलंदाज आहे. अनेकदा ऑस्ट्रेलिया संघाला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर विजय मिळवून देणाऱ्या शेन वॉर्नने २ जानेवारी, १९९२ रोजी आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली होती. (shane Warne debute)
शेन वॉर्नने आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक मोठ मोठे कारनामे केले. त्याने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात माजी भारतीय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना बाद करत माघारी धाडले होते. रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी या सामन्यात दुहेरी शतक झळकावले होते. यासह ४ गडी देखील बाद केले होते. परंतु, त्यांना बाद करण्याचा मान आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या शेन वॉर्नला मिळाला होता.
या कसोटी सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी कपिल देव, मनोज प्रभाकर आणि सुब्रतो बॅनर्जी या तिन्ही गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव अवघ्या ३१३ धावांवर संपुष्टात आणला होता. या तिघांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले होते. त्यावेळी शेन वॉर्नने फलंदाजी करताना २० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाकडून रवी शास्त्रीने २०६ आणि सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) १४८ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ४८३ धावांचा डोंगर उभारण्यात यश आले होते.
या दुहेरी शतकी खेळी दरम्यान रवी शास्त्रींनी शेन वॉर्नच्या गोलंदाजीवर धावांचा पाऊस पाडला होता. शेन वॉर्न पहिल्या डावात सर्वात महागडा गोलंदाज ठरला होता. त्याने ४५ षटक गोलंदाजी करून १५० धावा खर्च केल्या होता. यादरम्यान त्याला १ गडी बाद करण्यात यश आले होते. या डावात त्याने रवी शास्त्रींना बाद केले होते. हा सामना अनिर्णित राहिला होता. शेन वॉर्नबद्दल बोलायचं झालं, तर शेन वॉर्नच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये ७०० गडी बाद करण्याचा विक्रम आहे. असा कारनामा करणारा तो मुथय्या मुरलीधरन नंतर दुसराच गोलंदाज आहे.
हेही वाचा-
ऑस्ट्रेलियाला ‘न लाभलेला’ सर्वोत्तम कर्णधार